X Close
X
9819022904

ऑरेंज कॅपसाठी धवन, मॅक्सवेल, राहुलमध्ये चुरस


Mumbai:

मुंबई :आयपीएलच्या १४व्या हंगामातील डझनभर सामन्यानंतरची आकडेवारी पाहता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांसाठीच्या ऑरेंज कॅपसाठी दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन, बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, पंजाब किंग्जचा कर्णधार, सलामीवीर लोकेश राहुल तसेच कोलकाता नाईट रायडर्सच्या नीतीश राणामध्ये चुरस आहे.

धवन, मॅक्सवेल, राहुल तसेच राणाने प्रत्येकी तीन सामने खेळताना प्रत्येकी दोनदा पन्नाशी पार केली आहे. त्यात सर्वाधिक धावा धवनच्या नावे आहेत. त्याने तीन सामन्यांत ६२च्या सरासरीने १८६ धावा फटकावल्यात. पंजाब किंग्जविरुद्धची ९२ धावांची खेळी त्याची यंदाच्या हंगामातील सर्वाधिक खेळी आहे. सध्या धवनकडे ऑरेंज कॅप असली तरी अन्य दावेदारांच्या धावांमध्ये फार फरक नाही.

सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धही त्याने ८५ धावांची चमकदार खेळी केली होती. मॅक्सवेलने तीन सामन्यांत १७६ धावा काढल्या आहेत. बंगळूरूच्या सलग तीन विजयांमध्ये त्याचा मोठा वाटा आहे. कोलकाता तसेच हैदराबादविरुद्ध मॅक्सवेलची बॅट तळपली. त्याआधी सलामीला मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. पंजाबच्या यशस्वी वाटचालीला लोकेश राहुलच्या कॅप्टन्स इनिंगने तारले आहे. सलामीला राजस्थानविरुद्ध् ९१ धावांची खेळी करणाऱ्या राहुलने मागील सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध् ६१ धावा फटकावल्या. कोलकाताच्या नितीश राणाने सातत्य राखले आहे. सलामीला हैदराबादविरुद्ध ८० धावांची खेळी करणाऱ्या राणाने मुंबईविरुद्ध अर्धशतक झळकावले.

संजू सॅमसन एकमेव शतकवीर

यंदाच्या हंगामात सोमवारपर्यंतच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या रूपाने आयपीएल-१४ला एकमेव शतकवीर लाभला आहे. सलामीला पंजाब किंग्जवरुद्ध तिने ११९ धावांची मॅचविनिंग खेळी साकारली आहे.