मुंबई : १५० वर्षापेक्षा जुन्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्थानकाला लवकरच नवा साज मिळणार आहे. या स्थानकाचे संवर्धन व जपणूक करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून येत्या डिसेंबरमध्ये ती खुली केली जाईल. त्यामुळे या स्थानकाच्या प्रत्यक्षात कामाला नवीन वर्षातच सुरुवात होईल. या कामासाठी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
१८ नोव्हेंबर, १८६४ रोजी वांद्रे रेल्वे स्थानक सेवेत आले. येथील स्थानक इमारतीची निर्मिती १८८८ साली झाली. या स्थानकात चर्चगेट ते डहाणूदरम्यानच्या लोकल गाडय़ा थांबतात. तर हार्बर लोकल गाडय़ांनाही या स्थानकात थांबा आहे. गेल्या काही वर्षात वांद्रे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. असे ऐतिहासिक स्थानक लोप पावत चालले होते. त्याचे संवर्धन व जपणूक करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
या स्थानकाच्या पश्चिमेला एक नंबर फलाटाला लागूनच जुने कौलारू छप्पर, दरवाजे, खिडक्या आणि अन्य ऐतिहासिक वास्तूही आहेत. ऐतिहासिक वास्तूंना धक्का न लावता या स्थानकाचे नूतनीकरण व संवर्धन कसे करावे हा पश्चिम रेल्वेसमोर प्रश्नच होता. हे काम करताना स्थानकालाही नवा साज देण्याचा निर्णयही घेतला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी यासाठी सल्लागार नियुक्त केल्याचे सांगितले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वांद्रे स्थानकातील कामासाठी निविदा काढण्यात आली आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये निविदा खुली करण्यात येणार असल्याचे भाकर म्हणाले. त्यानंतर वास्तुविशारद व काही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली वांद्रे स्थानकाचे काम केले जाणार आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले.