X Close
X
9819022904

एकनाथ खडसेंना पंतप्रधान व्हायचेय!


eknath-khadse

जळगाव : भाजप नेत्या तथा केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी सध्या युतीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र दौ-यावर आहेत. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे प्रचारसभा आयोजित केली होती. यावेळी सभेला माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते. खडसे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान व्हायची इच्छा व्यक्त केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. गुजरातमधील एका छोटय़ा कुटुंबात जन्मलेले तसेच चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर मग मी पंतप्रधान का होऊ शकत नाही, असे यावेळी खडसे म्हणाले.

तत्पूर्वी, खडसेंनी त्यांच्या भाषणाला हिंदीतून सुरुवात केली. त्यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांना मराठीतून बोलण्याची विनंती केली. मात्र, खडसेंनी ‘‘मला हिंदीतून भाषण करायला आवडते. मी हिंदी विसरू नये म्हणून कधी कधी हिंदीतून भाषण करतो. माझीही संसदेत यायची मनापासून इच्छा होती, असे सांगत आपल्या मनातील भावना जाहीरपणे सांगून टाकली.

मला संपविण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मुक्ताईनगर मतदारसंघात माझ्या कन्येला पराभूत करण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर सोडा, सेनेचा बंडखोर रिंगणात आहे. एवढंच नाही तर मला संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगावात येऊन गेले. पवार राष्ट्रीय नेते असताना त्यांनी अशी भूमिका घ्यावी? असे असेल तर त्यांना राष्ट्रीय नेते म्हणावे तरी कसे? पण, एक गोष्ट आहे, पवारांमुळे माझी प्रतिष्ठा वाढली, असेही खडसे म्हणाले.

(PRAHAAR)