X Close
X
9819022904

उत्सव रद्द, तरीही पथकांकडून दहीहंडी पूजन


dahihandi-696x391

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या मूहूर्तावर राज्यासह मुंबईतील दहीहंडी पथकांच्या सरावाचा आरंभ होतो. गुरुपौर्णिमेपासून शहर-उपनगरातील दहीहंडी पथकातील गोंविदा एकमेकांवर थर रचण्याचा कसून सराव करतात. याच सरावातून मागील काही वर्षांत या दहीहंडी उत्सवाने नऊ थरांचीही सलामी दिली होती. मात्र यंदा अन्य सण-उत्सवांप्रमाणेच कोरोनामुळे दहीहंडी उत्सवही रद्द झाल्याने यंदा ढाकुम्माकुमचा गजर होणार नाही.


सामाजिक भान बाळगून यंदा सर्वत्र लोकहितार्थ व साधेपणाने उत्सव होणार आहे. याचाच भाग म्हणून गुरुपौर्णिमेला माझगावच्या श्रीदत्त क्रीडा मंडळाने टाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केले. गुरुपौर्णिमेला दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष व श्रीदत्त क्रीडा मंडळ या दहीहंडी पथकाचे प्रशिक्षक बाळा पडेलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रथेप्रमाणे दहीहंडीचे पूजन करून हंडी बांधण्यात आली. या पूजनासाठी दहीहंडी पथकातील अनेक गोविंदानी हजेरी लावून उत्साह वाढविला.


याखेरीज, सर्व गोविंदांनी रक्तदानही केले. सामाजिक अंतर राखत माझगाव ताडवाडी येथील जनता केंद्र येथे टाटा रुग्णालयातील कर्करोग रुग्णांसाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास १००हून अधिक व्यक्तींनी रक्तदान करून कर्तव्य पार पाडले.

(PRAHAAR)