लंडन (वृत्तसंस्था): पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेच्या दोन दिवस आधी इंग्लंडचे तीन क्रिकेटपटू आणि चार सहाय्यक कर्मचारी (सपोर्ट स्टाफ) कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यासह संपूर्ण इंग्लिश संघाला विलगीकरणात (क्वारंटाइन) ठेवण्यात आले आहे. परिणामी, पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत यजमानांचा नवा संघ उतरवला जाण्याची शक्यता आहे.
या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ८ जुलैपासून इंग्लंड आणि पाकिस्तान संघांत एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. कोरोनाने संघात शिरकाव केला असला, तरी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही मालिका वेळापत्रकानुसार होईल, असे सांगितले आहे. बेन स्टोक्स संघात परतला असून त्याला एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी या दोन्ही मालिकांसाठी संघाची कमान देण्यात आली आहे. कोरोना संक्रमित आढळलेले क्रिकेटपटू प्रोटोकॉलनुसार, ४ जुलैपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये असतील. संघातील अन्य खेळाडूदेखील त्यांच्या संपर्कात आले आहेत. अशा परिस्थितीत तेसुद्धा क्वारंटाइन असतील. बेन स्टोक्स संघात पुनरागमन करत असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे, असे ईसीबीकडून सांगण्यात आले आहे.
डेल्टा व्हेरिएंटच्या सुरुवातीला बायो बबलच्या विश्रांतीनंतर धोका वाढला आहे, हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल. आम्ही क्रिकेटपटू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सुधारणेसाठी प्रोटोकॉलचा नियम बनविला आहे. गेल्या १४ महिन्यांत प्रत्येकाने त्याला पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड या मालिकेसाठी नवीन संघ जाहीर करेल. ८, १० आणि १३ जुलै रोजी एकदिवसीय सामने होतील. त्याचबरोबर १६, १८ आणि २० जुलै रोजी टी-ट्वेन्टी सामने खेळले जातील.
इंग्लंडचा १८ सदस्यीय संघ जाहीर
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी नवीन १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद बेन स्टोक्सला देण्यात आले आहे. आधी जाहीर झालेल्या संघातील कोणत्याही खेळाडूला नवीन संघात स्थान दिले गेलेले नाही. तीन खेळाडू आणि चार सहाय्यक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले. ही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ८ जुलैपासून सुरू होणार आहे.
इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बेल, डेनी ब्रिग्ज, ब्रायडन कार्स, जॅक क्राउली, बेन डकेट, लुईस जॉर्ज, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, डेव्हिड मलान, साकीब महमूद, क्रेग ओव्हरटन, मॅट पार्किन्सन, डेव्हिड पेन, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन आणि जेम्स विंसी.
(PRAHAAR)