X Close
X
9819022904

आतापर्यंत काश्‍मीरमध्ये ४० ते ५० दहशतवाद्यांनी घुसखोरी, आणखी ३०० ते ३५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत


terrorism-759

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. पाकिस्तानने सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे सर्व मार्ग बंद झाल्याचे दिसल्यानंतर पाकिस्तानकडून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी होतच असल्याचे संरक्षण यंत्रणांकडून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत काश्‍मीरमध्ये ४० ते ५० दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचेही सांगण्यात येत आहे.

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद्यांचे लाँच पॅड वेगाने कार्यरत केल्याचे भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी याविषयी माहिती दिली. पाककडून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तर प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज असल्याचेही ढिल्लन यांनी यावेळी सांगितले. तसेच ढिल्लन यांनी, आजपर्यंत पाकिस्तानकडून अनेक दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घुसखोरी करण्यापासून रोखले असून अनेकांना कंठस्नान घातले आहे. तसेच ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेले शस्त्रास्त्र पाहून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांना देशात मोठा घातपात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

तसेच कलम ३७० हटवल्यापासून एकही दिवस असा नाही की, दहशतवाद्यांनी घुसखोरी केली नाही. रोज काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्यात येत आहे. दरम्यान, पाकव्याप्त काश्‍मीरमधून भारतात आता ३०० ते ३५० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.

(PRAHAAR)