मुंबई : कुर्ला स्थानकावर अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरड्या पद्धतीने लिंबू पाणी बनवणा-या व्यक्तीचा व्हीडिओ गेल्या २४ तासात व्हायरल झाला होता. हे लिंबू पाणी विकणा-या स्टॉलवर मध्य रेल्वे अधिका-यांनी कारवाई करत स्टॉल बंद केला आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ७/८वरील एका स्टॉलवर एक कामगार अस्वच्छ पद्धतीने लिंबू पाणी बनवत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली. रेल्वे अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लिंबू पाणी विक्रेत्याचा स्टॉल बंद करण्यात आला असून परवाना जप्त करण्यात आला असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ, पाण्याची तपासणी आरोग्य निरीक्षकांद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, या स्टॉलवरच्या उरलेल्या लिंबूपाण्याचे नमुने पुढील तपासासाठी घेण्यात आल्याचे देखील मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
काय आहे व्हीडिओमध्ये ?
कुर्ला स्थानकावरील हा व्हीडिओ असून नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक ठरेल, अशा अस्वच्छ पद्धतीने या व्हीडिओमध्ये एक कामगार लिंबू पाणी बनवताना दिसत आहे. अत्यंत अस्वच्छ, अडगळीच्या जागी उघड्यावर हा कामगार लिंबू पाणी बनवत आहे.
या व्हीडिओमधील कामगार एका बादलीत लिंबू सरबत बनवत असून त्याच बादलीत हातही धुताना दिसत आहे. त्या बादलीतील लिंबू पाणी नंतर एका मोठ्या पिंपामध्ये टाकत आहे. त्याच पिंपात हात बुचकळत ती व्यक्ती पाणी हलवत आहे. बाजूलाच असलेल्या टाकीतून बादलीतून पाणी घेऊन पुन्हा त्या पिंपात पाणी टाकत आहे. हा सगळा किळसवाणा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार व्हीडिओमध्ये कैद झाला आहे. व्हॉटस अॅप, फेसबुकवर हा व्हीडिओ गेल्या २४ तासात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच या कामगारावर ठोस कारवाई करण्याची मागणी नेटकरयांनी केली होती
(PRAHAAR)