X Close
X
9819022904

अस्थायी डॉक्टरांना वेतनवाढ!


bai-rukmini-hospital

पालिका महासभेत मांडणार प्रस्ताव, आरोग्य विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांचे सुतोवाच

डोंबिवली : महानगरपालिका रुग्णालयात स्थायी डॉक्टरांची कमतरता आहे, तर दुसरीकडे अस्थायी डॉक्टर पगार कमी असल्याने पालिका रुग्णालयात नोकरी करण्यास पुढे येत नाहीत. यावर उपाय म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अस्थायी डॉक्टरांच्या वेतनात वाढ करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच पालिकेच्या महासभेत मांडला जाणार असल्याचे संकेत पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांनी दिले आहेत.

कल्याण येथे पालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय, तर डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालय आहे. या दोन्ही रुग्णालयात कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या रुग्णालयातून मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, त्याचवेळी येथे कायमस्वरूपी अर्थात स्थायी डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. रुग्णालयात अद्ययावत सुविधा नसल्याने स्थायी डॉक्टर पालिका रुग्णालयात काम करण्यास नकार देतात. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होताना दिसतात.

स्थायी डॉक्टरांची कमतरता असल्याने अस्थायी डॉक्टरांची संख्या वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला खरा. पण, पगार खूपच कमी असल्याने अस्थायी डॉक्टरही पालिका रुग्णालयांकडे पाठ फिरवताना दिसतात.

या पार्श्वभूमीवर अस्थायी डॉक्टरांना पालिका रुग्णालयाकडे वळवण्यासाठी आता पालिकेने अस्थायी डॉक्टरांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून, हा प्रस्ताव लवकरच पालिका महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर या दोन रुग्णालयात एकूण ११५ डॉक्टर आहेत. यापैकी केवळ ४८ डॉक्टर प्रत्यक्षात कार्यरत आहेत. नियुक्त डॉक्टर काही वेळातच नोकरी सोडून जात असल्याने रुग्णालय प्रशासन चिंतेत असून रुग्णांचे हाल होताना दिसतात. त्यामुळेच यातून मार्ग काढण्यासाठी, अस्थायी डॉक्टरांना पालिका रुग्णालयाकडे वळवण्यासाठी पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता किती फायदेशीर ठरतो, हे लवकरच समजेल.

(PRAHAAR)