X Close
X
9819022904

अवकाशात झेपावण्यासाठी ‘चांद्रयान-२’ सज्ज!


chandrayaan-2

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रविवारी संध्याकाळपासून याच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. नव्या वेळेप्रमाणे, आज (सोमवारी) दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. यापूर्वी चांद्रयान-२च्या प्रक्षेपणाची तारीख १५ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आयत्यावेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने, शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.

चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणात १५ जुलै रोजी आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. गेल्या शनिवारी इस्रोने चांद्रयान-२च्या प्रक्षेपणासाठीचे यान जीएसएलव्ही मार्क ३ एम१ची तालीमही पूर्ण केली आहे. यावेळी त्याच्या कामगिरीत कुठलीच अडचण आढळून आली नाही. त्यामुळे आता सोमवारी दुपारी २.४३ वाजता चांद्रयान-२चे प्रक्षेपण होईल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन यांनी दिली. या मोहिमेत काम करणाºया वैज्ञानिकांनी सांगितले की, मोठी दुर्घटना होण्याऐवजी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले यासाठी इस्रोचे कौतुक करायला हवे. चांद्रयान-२ चे वहन करणारे वजनदार रॉकेट डीएसएलव्ही मार्क -३ चा सराव पूर्ण केला आहे. ‘बाहुबली’ या नावाने चर्चेत असलेले हे रॉकेट उत्तम प्रकारे काम करत आहे. या रॉकेटमध्ये ३.८ टनाचे चांद्रयान-२ अतराळ यान आहे. या रॉकेटच्या उड्डाणानंतर सुमारे १६ मिनिटांनंतर ३७५ कोटी रुपये किमतीचे जीएसएलव्ही – मार्क ३ रॉकेट ६०३ कोटी रुपये किमतीच्या चांद्रयान-२ अंतराळ यानाला पृथ्वी पार्किंगध्ये १७० गुणिले ४०४०० किलोमीटरच्या कक्षेत सोडणार आहे. पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर आहे सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर. चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जाणार आहेत.

४ टन श्रेणीच्या उपग्रहांच्या वहनासाठी तयार

जीएसएलव्ही मार्क-३ या रॉकेटची निर्मिती विशेषत: जियोसिंक्रोनस ट्रान्स्फर आॅर्बिटमध्ये (जीटीओ) ४ टन श्रेणीतील उपग्रह घेऊन जाता यावेत यासाठी तयार करण्यात आली आहे. यात दोन मजबूत स्ट्रेप ऑन मोटर आहेत. यात एक कोअर बूस्टर बसवण्यात आला आहे, तर वरील भागात क्रायोजेनिक देण्यात आला आहे. आतापर्यंत इस्रोने २ जीएसएलव्ही – एमके २ रॉकेट पाठवले आहेत. हे रॉकेट जियो ट्रान्स्फर ऑर्बिटमध्ये पोहोचल्यानंतर चांद्रयान-२ ला १७० किलोमीटर गुणिले २०००० किलोमीटर कक्षेत स्थिर करेल. यानंतर चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेकडे झेपावेल.

(PRAHAAR)