मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर, अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील एकूण १२ ठिकाणी आज छापे टाकले आहेत. यात मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगरमधील घरावर तसेच सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय टीमने झडती घेतली आहे. याशिवाय ठाणे, नाशिक, सांगली, अहमदनगर आणि पुणे येथे काल छापे टाकण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. या कारवाईदरम्यान अनिल देशमुख प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व इलेक्टॉनिक पुरावे हाती लागल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे.
ईडीचे पथक पोहोचले संगमनेरमध्ये
मुंबई पोलीस दलात उपायुक्त असलेल्या राजू भुजबळ यांचे घर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असून ईडीच्या पथकाने तिथे धडक दिली आहे. ईडीची टीम दोन वाहनांतून आली होती. त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांकडे मात्र याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करत असताना ईडीच्या हाती काही कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट डाटा सापडला असून त्याआधारावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे कळते.