X Close
X
9819022904

Whale Rescue operation : गणपतीपुळ्यात व्हेल माशाच्या पिलाचं देशातील सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी


Dead whales-7HR48_1

तब्बल ४० तास सुरु होते प्रयत्न

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) येथे व्हेल माशाच्या पिलाचं (Whale Fish) रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं. व्हेलला जिवंत पाण्यात सोडण्याचं हे देशातील पहिलं रेस्क्यु ऑपरेशन ठरलं आहे. तब्बल २० फूट लांब आणि पाच टन वजनाच्या व्हेलला वाचवण्यासाठी ४० तास या शर्थीचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर रात्री ११च्या सुमारास व्हेल माशाचं पिल्लु समुद्रात सुखरूप सोडण्यात यश आलं.

कोस्टगार्डसह सर्वच विभागांच्या प्रयत्नांना अखेर ४० तासांनंतर यश आलं. समुद्रामध्ये जवळपास ४ ते ५ किलोमीटर आतमध्ये या व्हेल माशाच्या पिल्लाला सोडल्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सर्वांनी जल्लोष केला. दरम्यान, हे ऑपरेशन यशस्वी होऊन जवळपास १५ तास लोटलेले आहेत. त्यामुळे सदरचं पिल्लू सुरक्षित असावं असा आशावाद आहे.

सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचं पिल्लू किनाऱ्यावर असल्याचं दिसून आलं. त्याच दिवशी जवळपास तीन वेळा माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडलं गेलं. परंतु, १४ नोव्हेंबरला सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसलं. भरतीच्या वेळी समुद्रात पाठवण्याचे दोनदा प्रयत्न केले. पण हा मासा पुन्हा किनाऱ्यावर आला. दोन क्रेनच्या साह्याने या पाच टन वजनाच्या व्हेलला हलवणे कठीण झाले होते.

पर्यटक, स्थानिक नागरीक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर ‘ऑपरेशन व्हेल’ सुरू करून काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सोडण्यात यश आलं. हे ऑपरेशन यशस्वी झालं असलं तरी इतर कुठल्या भागामध्ये हे पिल्लू किनारपट्टीवरती मागे फिरत नाहीये ना? याकडे देखील सध्या लक्ष ठेवले जात आहे.

 

(PRAHAAR)