मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगबग सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने (Central government) विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन १८ सप्टेंबर म्हणजेच गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सुरु होणार आहे. पण याच दिवशी राज्याच्या दृष्टीने आणखी दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या केसेसची सुनावणी पार पडणार आहे. या तीन घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने (Thackeray group) सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवाय विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीला उशीर करत आहेत, याबद्दल देखील ठाकरे गटाने याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला एक वर्ष उलटून गेले आहे. निवडणूक आयोगाने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. हा निकाल चुकीचा ठरवत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्ट काय निकाल देतं, हे पाहावं लागेल. शिवाय १६ आमदारांच्या अपात्रतेचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न आता आणखी लांबणीवर गेल्याने सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर काय टिपण्णी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(PRAHAAR)