नवी दिल्ली : ‘चांद्रयान ३’ (chandrayaan 3) ही मोहीम यशस्वी होताच आता आणखी एका मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे. याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंद करताना केला होता. त्यांनी माहिती दिली की सूर्याचा अभ्यास करणारी मोहीम लवकरच लाँच होईल.
चंद्रावर तिरंगा फडकावल्यानंतर इस्त्रो आता आपल्या पुढील मोहिमेवर काम करणार आहे. इस्त्रोची पुढील मोहीम आहे सूर्य मोहीम. पंतप्रधान मोदी यांनी सूर्य मोहिमेबद्दलसांगितल्यानंतर इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सूर्याच्या या मोहिमेबद्दलची माहिती जाहीर केली.
सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल १ सप्टेंबरमध्ये लाँच केले जाणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आदित्य एल १ हे LMVM-3 प्रक्षेपकाच्या मदतीने लाँच केले जाईल. लाँचिंगनंतर ४ महिन्यांनी हे यान आपल्या ठरवलेल्या ठिकाणी पोहोचेल.
सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आदित्य एल १मध्ये ७ विविध उपकरणे लावण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी तब्बल ३७८ कोटी रूपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे.
आदित्य एल १ मोहीम ही इस्त्रोची आतापर्यंतची सगळ्यात कठीण मानली जाणारी मोहीम आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत अमेरिका, जर्मनी, युरोपियन एजन्सींनी २२ याने पाठवली आहेत. लवकरच इस्त्रो या ग्रुपमध्ये सामील होणार आहे.
(PRAHAAR)