iगंगटोक: सिक्कीमसाठी(sikkim) पुढील २४ तास धोक्याचे आहेत. हवामान विभागाने येथे दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. इतकंच नव्हे तर बिहार, बंगाल, मेघालय, आसाम आणि झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
सिक्कीमध्ये बुधवारी जो प्रकोप पाहायला मिळाला त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही लष्कराच्या २२ जवानांसह तब्बल ७० लोक बेपत्ता आहे. या बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. ढगफुटी झाल्याने सिक्कीममध्ये पूर आला.
रात्रीच्या अंधारात ढगफुटी झाली आणि सकाळच्या उजेडात सगळीकडे निसर्गाने केलेल्या प्रकोपाच्या खुणा दिसत होत्या. सैलाबच्या समोर जे आले ते वाहू लागले. जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी. मिळालेल्या माहितीनुासर ल्होनक तलावावर रात्रीच्या सुमारास ढगफुटी झाली. यानंत लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली. नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीच्या जवळपास परिसरात पाणी भरू लागले. अनेक घरांमध्ये पाणी भरले.
या नदीलगत लष्कराचा तळही होता. नदीला आलेल्या पुराचा फटका या तळाला बसला. येथील २२ जवान बेपत्ता झाले आहेत. १७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबरला घेतल्या गेलेल्या फोटोमध्ये ल्होनक तलावाचे क्षेत्रफळ १६२.७ आणि १६७.४ हेक्टर दिसते. तर या पुरानंतर घेतलेल्या फोटोत दिसत आहे की तलावाचे क्षेत्रफळ अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. आता यातील ६०.३ हेक्टर भागात पाणी दिसत आहे. म्हणजेच ल्होनक तलावातील १०५ हेक्टर क्षेत्रातील पाणी वाहून गेले आणि हे पाणी वेगाने सिक्कीच्या खालच्या भागात गेले. यामुळे येथे भयंकर पूर आला आहे.
(PRAHAAR)