चंद्रपूर / वर्धा / गोंदिया : पावसाने नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गोंदिया व गडचिरोली (Chandrapur, Wardha, Gondia, Gadchiroli) जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली आहे. यावेळी वीज पडून ११ जण ठार, तर १४ जण झखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून आठ ठार तर नऊ जण जखमी झाले.
वर्धा जिल्ह्यातील गिरड परिसरात जोरदार पावसासह गारपीटही झाली. तेथे वीज पडून एक जण ठार, तर पाच जखमी झाले. गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातही प्रत्येकी एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा येथील शेतशिवारात रोवणी सुरू असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास वीज कोसळली. यात अर्चना मडावी (वय २७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
खुशाल ठाकरे (३०), रेखा सोनटक्के (४५), सुनंदा इंगोले (४६), राधिका भंडारे (२०), वर्षा सोयाम (४०), रेखा कुळमेथे (५५) हे सहा जण यावेळी जखमी झाले. यापैकी खुशाल ठाकरे याची प्रकृती चिंताजनक आहे.
ब्रह्मपुरीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटाळा येथील महिला धानरोवणी आटोपून गावाकडे परत येत असतानाच पावसाला सुरुवात झाली. तेव्हा अचानक वीज कोसळली. यात गीता ढोंगे (४५) या महिलेचा मृत्यू झाला.
सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथी शेतात काम करणाऱ्या महिलांवर वीज कोसळली. त्यात कल्पना झोडे (४०), अंजना (५०) या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर, सुनीता आनंदे ही जखमी झाली.
गोंडपिंपरी तालुक्यातील चिंवडा येथील वनमजूर गोविंदा टेकाम हा जंगलात काम करीत असताना त्याच्यावर वीज कोसळली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
कोरपना तालुक्यातील खैरगाव येथे शेतात फवारणी करीत असणाऱ्या पुरुषोत्तम परचाके (वय २५) या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला.
नागभीड तालुक्यातील नांदेड येथील शेतात रोवणी सुरू असताना वीज कोसळून शोफिया शेख (१७), महेशा शेख (१६) या दोन तरुणी जखमी झाल्या.
अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) तालुक्यात बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या पावसादरम्यान बोळदे/करड येथील शेतात दुपारी वीज पडून रोहिदास हुमणे (५३, रा. बोळदे) याचा मृत्यू झाला.
गडचिरोली मधील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे बुधवारी सकाळी शेतीच्या कामावर गेलेल्या लक्ष्मण रामटेके (५४)या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला.
(PRAHAAR)