नागपूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील अंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्टपासून आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पून्हा एकदा पेटून उठला आहे. याबाबत नागपुरातील संस्थानिक आणि भोसले घराण्याचे विद्यमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी वेगळीच मागणी केली आहे. एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा, असे मुधोजीराजे भोसले (Mudhojiraje Bhosale) म्हणाले.
एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा. या संदर्भात आपण राज्यातील मराठा संघटनांची चर्चा करुन त्यांची समजूत काढू, सर्वांना समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करु, असेही मुधोजीराजे भोसले म्हणाले.
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जो प्रकार घडला, तो दुर्दैवी होता. आरक्षणासाठी मराठा समाज पूर्वीपासून एकजूट होऊन काम करत आहे. अचानक मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीमार नींदनीय आहे, असे मुधोजीराजे म्हणाले.
मराठ्यांची आरक्षणाची मागणी प्रामुख्याने पुढच्या पिढीसाठी आहे. राजघराणे, उद्योजक यांना आरक्षण नकोय पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण हवं आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नकोच, आम्ही शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत आहोत. जर सरकारला ते द्यायचे नसेल तर सरकारने समान नागरी कायदा करावा आणि सर्वांना समान पातळीवर आणावं. एकदा समान नागरी कायदा लागू झाला तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी, असे मुधोजीराजे भोसले म्हणाले.
शिक्षण आणि नोकरी या दोनच मुद्द्यांसाठी आम्ही लढतोय. आम्हाला जमीन द्या किंवा राजकारणात आरक्षण द्या अशी मागणी कोणताही मराठा बांधव करत नाही. मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी किती वर्ष संघर्ष करायचे. त्यामुळे एक तर शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण द्यावं, नाही तर समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
(PRAHAAR)