X Close
X
9819022904

Diwali Shopping : चला, दिवाळीच्या शॉपिंगला! पण कुठे?


Diwali-india
उठा उठा दिवाळी आली, शॉपिंग करण्याची वेळ झाली! अवघ्या सात दिवसांनी दिपावली सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळी खरेदीसाठी रविवारी, ५ नोव्हेंबरला खरेदीसाठी झुंबड उडणार आहे. यावर्षी वसुबारस ९ नोव्हेंबरला आहे. तर १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी. धनत्रयोदशीनंतर रविवारी, १२ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन आहे. तर मंगळवारी पाडवा आणि बुधवारी भाऊ बीजचा सण आहे. या दिवाळीची आणि त्यानिमित्त खरेदीची उत्सुकता सर्वांनाच असते. दिवाळी आणि खरेदी हे समीकरण अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्या शॉपिंग मॉल्स, शॉपिंग स्ट्रीट्स आणि ऑनलाइन दुकानंदेखील भरून गेलेली दिसताहेत. ट्रेण्डमध्ये काय आहे, कुठल्या अ‍ॅक्सेसरीज घ्याव्या, वगैरे टिप्स आपण नेहमी वाचतो. पण दिवाळीच्या गर्दीत नेमकी आपल्याला हवी ती गोष्ट कशी निवडायची? कुठून घ्यायची? कुठल्या गोष्टी कुठून खरेदी कराव्या हे सांगणाऱ्या काही टिप्स… – राजेश सावंत दिवाळी म्हणजे सर्वच गटातील लोकांसाठी आनंद साजरा करण्याचा आणि वाटण्याचा सोहळा असतो. दिवाळीच्या आधी दिवाळीची जोरदार खरेदी केली जाते. दिवाळीसाठी केवळ रेडिमेड फराळ आणि कपडे नाहीतर दिवे, आकाश कंदील, लाईट्सच्या माळा, विविध प्रकारच्या रांगोळी, रांगोळीचे साचे यांचीही खरेदी केली जाते. दिवाळीसाठी ड्रेस, साड्या, गृहसजावटीच्या वस्तू यांच्या व्हरायटी तुम्हाला मुंबईत मिळतील. मुंबईत होलसेल व्यापाऱ्यांकडे खरेदी केल्याने तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत या वस्तू मिळतात. वेस्टर्न ड्रेस, टॉप्स, स्कर्ट्स असे वेस्टर्न वेअर घ्यायचे असतील तर तुम्ही त्याचं स्ट्रीट शॉपिंग करू शकता. मुंबईतील लिंक रोड, फॅशन स्ट्रीट, कुलाबा कॉजवे असो किंवा पुण्यातील कॅम्प, तुळशी बाग, फग्र्युसन कॉलेज रोड असो, तुमच्या शहरातील शॉपिंग स्ट्रीट्सवर दिवाळीच्या आधी फ्रेश स्टॉक नक्की आलेला असणार. पण असं स्ट्रीट शॉपिंग करताना लक्षपूर्वक केलं पाहिजे. कपडय़ाची क्वालिटी, रंग याबाबत फार शाश्वती नसल्याने या गोष्टी ध्यानात घेऊनच ड्रेस सिलेक्ट करावा. दिवाळीसारख्या सणासाठी बहुतेकांचा कल एथनिक वेअर खरेदी करण्याकडे असतो. एथनिक वेअर चांगल्या नावाजलेल्या दुकानामधून घेणं योग्य ठरेल. प्रत्यक्ष शोरूममध्ये जाऊन, थोडं विंडो शॉपिंग केल्यानं तुम्हाला हवा तो आवडता ड्रेस नक्की सापडेल. मोठय़ा दुकानांमधून का, तर मटेरिअल, कपडय़ावरील वर्क, रंग याबाबत अशा मोठय़ा दुकानांमधून खात्री दिली जाते. काही बिघाड झाल्यास तुम्ही त्या शॉपमध्ये जाऊन दुरुस्ती करून घेऊ शकता. त्यामुळे ती चिंता राहात नाही. फॅशन स्ट्रीट, चर्चगेट फॅशनच्या बाबतीत नेहमीच अप टू डेट राहणारं मुंबईतील ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’. इथं फुटपाथवर साधारण पन्नासहून अधिक स्टॉल्स आहेत. या ठिकाणाची खासियत म्हणजे इथे मुलांचेही ट्रेंडी कपडेही मिळतात. विविध प्रकारची फॅशनेबल जॅकेट्स ही इथं आहेत. गॉगल्स, बूट, चप्पल, जॅकेट, जीन्स, फॅन्सी ड्रेस आदी सर्व वस्तू तुम्हाला इथं मिळू शकतील. चोर बाजार जुन्या वस्तू, प्राचीन भेटवस्तू, दुर्मिळ वस्तू आदी गोष्टींसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. जुन्या आणि पुरातन वस्तूंसाठी हे खास करून प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या अनुषंगाने विविध वस्तूंची इथं खास रेलचेल पाहायला मिळते. लोहार चाळ दक्षिण मुंबईतील लोहार चाळ परिसर नेहमी विद्युत रोषनाईने नटलेला असतो. कारण, इथे लाईट्सच्या व्हरायटीजचे मोजताही येणार नाहीत इतके प्रकार मिळतात. दिवाळीसाठी तुमचे घर किंवा ऑफिस उजळण्यासाठी इथे दुकानांमध्ये अनेक फॅन्सी दिवे उपलब्ध आहेत. तसेच फुलांच्या माळा, वेगवेगळी तोरणं, फ्लॉअर पॉट्सही इथे मिळतील. भुलेश्वर-काळबादेवी बाजार भुलेश्वर-काळबादेवीचा परिसर दिवाळीसाठी रंगून जातो. इमिटेशन ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या भुलेश्वरच्या मार्केटमध्ये विविध रंगाच्या मोत्यांच्या-खड्यांच्या लेस, दागिने, कपडे, पुजासाहित्य, देवादिकांच्या मुर्त्या, भांडी आदी सर्वकाही मिळतं. भुलेश्वर मंडईत फळफळावळ आणि भाज्या मिळतात. तसंच या मंडईत विशेषतः फुलांची वेगळी मंडई आहे. मुंबईतील भुलेश्वर मार्केट पूर्वी भोलेश्वर मार्केट म्हणून ओळखले जात असे. या मार्केटमध्ये दिवे, सजावटीच्या वस्तू, रांगोळीसाठी रंग आणि स्टॅन्सिल, स्टिकर रांगोळी आणि विविध प्रकारचे मातीचे दिवे स्वस्त दरात मिळतात. कपडे खरेदीसह इथे मिळणारे रेडिमेड फराळही प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत तुम्हाला साड्यांच्या अनेक व्हरायटी मिळतील. कांजिवरम, जोधपुरी, मारवाडी, नऊवारी, पैठणी तसेच रेग्युलर वापराच्या अनेक व्हरायटी मिळतील. हिंदमाता मार्केट, दादर हिंदमाता क्लॉथ मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे मिळतील. केवळ कपडे नाही तर ड्रेस शिवण्यासाठीचे कापड, कटपीस, साडया, मुलांसाठीचे कपडे यांची भरपूर व्हरायटी इथे तुम्हाला मिळेल. तुम्ही इथे अगदी २५ रूपयाला एक साडी खरेदी करू शकता. इथला नियम इतकाच आहे की तुम्ही एकाच प्रकारच्या १२ साड्या किंवा अर्धा डझन साड्या खरेदी कराव्यात. लग्नाच्या बस्त्यांसाठी दादरचे हे मार्केट हमखास गर्दीने भरलेले असते. या मार्केटमध्ये स्वस्त साड्या मिळत असल्याने महिला वर्ग येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात. तुम्हाला योग्य वस्तू शोधण्यात मदत करण्यासाठी या मार्केटमध्ये भरपूर दुकाने आणि बुटीक आहेत. नायके, पुमा, रिबॉक इत्यादी ब्रँडेड वस्तूंचे कारखानेही या भागात आहेत. मुंबईत ‘कमी खर्चात ब्रँडेड दिवाळी’ साजरी करायची असेल तर हिंदमाता मार्केट हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. दादर जनता मार्केट कपडे खरेदी करायचे असतील तर दादर जनता मार्केट सगळ्यात चांगले आहे. दादर येथे स्टेशन जवळच काही अंतरावर एका इमारतीमध्ये खुप प्रसिद्ध जनता मार्केट आहे, येथे तुम्हाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे होलसेल दरात खूपच सुंदर आणि भरपुर वेगवेगळे प्रकार मिळतात. किरकोळ आणि होलसेल अशा दोन्ही प्रकारे येथे खरेदी करता येते. त्यामुळे तुम्ही दादर येथे जनता मार्केटमध्ये एकदा नक्की जाऊन या. तुम्हाला नक्कीच जनता मार्केटमध्ये भरपूर छान छान कपडे होलसेल दरात मिळतील. या ठिकाणी कपडे खरेदीसाठी देशभरातून लोक येत असतात. दादर मार्केटमध्ये महिला, पुरुष, लहान मुलांची विविध प्रकारचे कपडे मिळतात. होलसेल दरात कपडे मिळत असल्याने मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते. हाजी अली मार्केट सुंदर, रंगीबेरंगी कंदील, कलाकुसरीच्या यामुळे दिवाळीच्या आनंदात भरच पडते. याशिवाय घराची सजावटही पूर्ण होते. हाजी अली परिसरातील सुप्रसिद्ध हीरा पन्ना शॉपिंग मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते. इथे तुम्ही ब्रँडेड घड्याळे, पादत्राणे, गॅझेट्स इत्यादींची कॉपी देखील स्वस्तात खरेदी करू शकता. लॅमिंग्टन रोड, ग्रँटरोड दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, उपकरणांची खरेदी करायची असेल तर लॅमिंग्टन रोड हा चांगला पर्याय आहे. मोबाइल, लॅपटॉप, कम्युटर, हेडफोन, होम सिस्टीम, टीव्ही यांसारखे अनेक गॅझेट्सची इकडे तुम्ही खरेदी करु शकाल. शिवाय स्वस्त आणि मस्त अशी दिव्यांची माळांची इथे खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे ग्रँटरोडच्या कापड बाजारालाही भेट द्या. कपड्यांच्या होलसेल खरेदीसाठी हा कापड बाजार ओळखला जातो. इथे ब्रँडेड कपड्यांमध्येही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. कापडापासून बनवलेल्या पर्सेस ही या बाजाराची खासियत म्हणता येईल. चिवडा गल्ली, लालबाग आजकाल रेडिमेड फराळ आणण्याकडे सगळ्यांचा कल असतो. चिवडा हा तर दिवाळीच्या फराळाचा अविभाज्य घटक. त्यामुळे चिवडा घेण्यासाठी लालबागच्या चिवडा गल्लीत मुंबईकरांची गर्दी असते. पारंपरिक पोह्याच्या चिवड्यापासून ते मका चिवडा, भडंग चिवडा येथे मिळतो. तसेच दिवाळीचा इतर सर्व फराळ देखील तुम्हाला इकडे मिळेल. अगदी चकली, शंकरपाळी, करंजी, अनारसे, शेव, लाडू, जिरा पुरी आदी पदार्थ मिळतील. कंदील गल्ली, माहिम दिवाळीच्या मोसमात माहिमाचा एलजे रोड अर्थात सिटी लाईट सिनेमागृहाचा परिसर आकाश कंदीलांनी गजबजतो. म्हणूनच या गल्लीला कंदील गल्ली असे म्हणतात. इथं मिळणाऱ्या कंदिलाची खासियत म्हणजे येथे बहुतांश घरगुती बनवलेले कंदील असतात. कंदिलांबरोबर तुम्हाला दिवाळीच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं, रंगबेरंगी आणि आकर्षक अशा पणत्या, आपलं घर उजळून दिसावं त्यासाठी दिव्यांची माळ, रांगोळी मिळेल. दादर मार्केट दिवाळीसारख्या सणासाठी बहुतेकांचा कल पारंपारीक पोशाख खरेदी करण्याकडे असतो. यात मुली अनारकली, लेहेंगा, साड्या तर मुलं शेरवानी, सदरा लेंगा आदी कपडे खरेदी करतात. कबुतरखाना येथे तुम्हाला अनेक प्रकारचे दिवे, पणत्या विविध लायटिंग तोरणं मिळतील. रानडे रोड म्हणजेच छबिलदासच्या गल्लीत अगदी छोटे तसेच मोठे कंदिल येथे उपलब्ध आहेत. कागदी, कापडी, प्लास्टिक अशा वेगवगळ्या प्रकारचे हटके कंदील, तोरणं इथं आहेत. दादरच्या किर्तीकर मार्केट मध्ये खास महाराष्ट्रीय पद्धतीची इमिटेशन ज्वेलरी उपलब्ध आहे. यात विविधरंगी झुमके, ठुशी, राणीहार, बाजूबंद, कमरपट्टा, बुगड्या, नथ, पाटल्या, मोत्यांचे दागिने आहेत. दादर पूर्वेला हिंदमाताकडे साड्यांची मोठी बाजारपेठ आहे. सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला इथं मिळतील. गांधी मार्केट, किंग्ज सर्कल इमिटेशन ज्वेलरी, धातूच्या वस्तू आणि हटके चप्पलांची खरेदी करायची असेल तर महात्मा गांधी मार्केटला भेट द्यावी. स्वस्तात मस्त आणि खूप पर्याय किंग्ज सर्कल भागात असलेल्या या मार्केटमध्ये बघता येईल. कपड्यांपासून फर्निचरपर्यंत सर्व काही इकडे आहे. पंजाबी ड्रेस, कुरता, साड्या यांच्यासह ओढण्यांचे अनेक प्रकार तुम्हाला इकडे मिळतील. डिझाईन न केलेल्या प्लेन साड्या, ड्रेस मटेरियल, शर्ट-पँट पीस इथं सवलतीच्या दरात मिळतात. धारावी लेदर मार्केट दिवाळीसाठी जोरदार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मुंबईतील माहिम किंवा वांद्रेपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या धारावीच्या लेदर मार्केटला नक्की भेट द्या. चामड्यापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू इथं आहेत. लेडीज आणि जेन्ट्स बॅग्स, जॅकेट्स, बेल्ट्स अशा अनेक स्वस्त आणि मस्त वस्तू तुम्हाला येथे मिळतील. धारावी कुंभारवाड्यात वेगवेगळ्या आकाराच्या सुबक आणि आकर्षक पणत्या मिळतील. लिंकिंग रोड, वांद्रे पारंपारिक आणि वेस्टर्न असं सर्व काही लिंकिंग रोडवर उपलब्ध आहे. शूज, बॅगा आणि फॅशनेबल कपडे खरेदीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. सध्या दिवाळीच्या मोसमात नवे ट्रेंडी कपडे इथे हमखास मिळतील. पण येथील खासियत म्हणजे ‘लिंकिंग रोड शूज मार्केट’. इथं तुम्हाला सर्व चपला अगदी स्वस्तात मिळतील. मग ते लोफर्स असो वा बॅलेरिनाज, सिक्वीन हिल असो वा वेजेस. सर्व प्रकारच्या चपला तुम्हाला इथं मिळू शकतात. तसंच वांद्य्राच्या हिल रोडलाही बदलत्या फॅशनप्रमाणे कपडे, ज्वेलरी, चपला मिळतात. फॅशनेबल कपडे तुम्हाला इथं मिळतील. नटराज मार्केट, साईनाथ मार्केट, मालाड मालाड पश्चिमेला रेल्वे स्टेशन लगत नटराज मार्केट आणि साईनाथ मार्केट अगदी जवळजवळ आहेत. येथे पंजाबी ड्रेस, कुरता, साड्या, ड्रेस मटेरियल, शर्ट-पँट पीस इथं सवलतीच्या दरात मिळतात. दिवाळीच्या मुहूर्तावर पारंपरिक पेहराव आणि त्यावर कुंदनाचे आणि आर्टिफिशल खड्यांचे दागिने घालून पारंपरिक पद्धतीने तुम्ही सजण्याचा विचार करत असाल तर नटराज मार्केटला नक्की भेट द्या. विविध प्रकारचे दागिने, घागरा चोळी, ड्रेस, पंजाबी सूट, डिझायनर ओढण्या येथे मिळतील. खड्यांच्या दागिन्यांसाठी या मार्केटमध्ये विशेषतः लोकांची गर्दी असते. ठाणे घराच्या सजावटीपासून कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्य पदार्थ, ज्वेलरी अशी सगळी खरेदी एकाच ठिकाणी करण्यासाठी ठाण्यातील बाजारपेठेला प्राधान्य दिलं जातं. ठाण्यात गोखले रोड, राम मारुती रोड, नौपाडा, कोपिनेश्वर मार्केट अशा वेगवेगळ्या ठिकाणी सजावटीच्या वस्तूंपासून मुला-मुलींचे ट्रेंडी कपडे इथं मिळतील. माती तसंच धातूच्या पणत्या, रंगीबिरंगी आणि वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील, रांगोळी, रांगोळीचे साचे या वस्तूंच्या खरेदीसाठी अनेक पर्याय इथं उपलब्ध आहेत. कुर्ती आणि स्कर्ट, एथनिक गाऊन, डिझाइनर पंजाबी ड्रेस, साड्या, पलाझो ड्रेस अशा कपड्यांची खरेदी तुम्ही इथं करु शकाल. कळंबोली मार्केट वाशी किंवा नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी कळंबोली सेक्टर १७ मधील मार्केट दिवाळी खरेदीसाठी एक उत्तम पर्याय आहे. बच्चे कंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यत सर्वांसाठी येथे कपडे, शूज आणि इतर गोष्टीतही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय घरगुती वापरातील अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवाळी निमित्त इथं येऊ शकता. (PRAHAAR)