मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर या दोघांच्याही घरी कालपासून ईडीचे धाड सत्र सुरु आहे. त्याचसोबत आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह माजी सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल, पालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार आणि बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्या घरी सुद्धा ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. कोरोना काळातील (BMC Covid Scam) कोविड घोटाळा प्रकरणांमध्ये या धाडी टाकण्यात आल्या.
मुंबई महानगर पालिकेच्या भायखळा कार्यालयात आज ईडीने धाड मारली. यावेळी मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात चक्क मृतदेहांसाठीच्या बॅग खरेदीमध्ये घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. वाढीव दराने औषध खरेदी, मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा आणि बोगस कर्मचारी दाखवून गैरव्यवहार झाला, हे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलेले आहे.
ईडीच्या तपासात असेही समोर आलेले आहे की, ज्या बॉडी बॅग्स मार्केटमध्ये दोन हजारांना मिळत होती. त्या पालिकेने तब्बल ६ हजार ८०० रुपयांना विकत घेतल्या. तसेच लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने स्टाफ खर्चाची बिलं महानगरपालिकेला दिली, त्यामध्ये गैरकारभार झालेला आहे. ज्यांनी कधीच डॉक्टर आणि इतर स्टाफ म्हणून काम केले नाही त्यांच्या नावे पैसे उकळले गेले. काल जी धाड टाकली गेली त्यात ६८.५ लाख रुपये कॅश रिकव्हरी झाल्याचे समजते.
(PRAHAAR)