कोलंबो: वर्ल्डकप २०२३ची रंगीत तालीम असलेल्या आशिया चषकमध्ये भारताने बाजी मारली. भारताने आशिया चषकच्या(asia cup 2023) अंतिम फेरीत श्रीलंकेला एकतर्फी हरवत विजेतेपद पटकावले. पहिल्यापासूनच भारताने श्रीलंकेवर दबाव टाकला त्यामुळे श्रीलंकेला डोके वर काढताच आले नाही.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र त्यानेच घात केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला आपल्या संपूर्ण संघाचे मिळून केवळ अर्धशतकच ठोकता आले.
भारताच्या मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर श्रीलंका हतबल झाली. श्रीलंकेच्या खेळाडूंनी सिराजसमोर अक्षरश: लोटांगण घातले. लंकेच्या केवळ दोनच फलंदाजाना १७ आणि १३ इतकी धावसंख्या करता आली. तीच त्यांची या सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. बाकी इतर फलंदाज साफ अपयशी ठरले.
भारताच्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे अर्धा डझन फलंदाज तंबूत धाडले. त्यानंतर हार्दिक पांड्यानेही त्याला सुरेख साथ दिली. त्याने ३ विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला धावसंख्या वाढवूच दिली नाही.
श्रीलंकेने दिलेले केवळ ५० धावांचे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केले. भारताच्या सलामीला आज इशान किशन आणि शुभमन गिल उतरले होते. इशान किशनने २३ धावा केल्या तर शुभमन गिलने २७ धावा केल्या आणि भारताने या सामन्यात १० विकेटनी विजय मिळवला.
(PRAHAAR)