बिजिंग : बनावट आणि हुबेहुब वस्तू निर्मितीमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या चीनने (China) आता कृत्रिम सूर्य (Artificial Sun) तयार केला आहे. चीनने चक्क डुप्लिकेट सूर्याचीच निर्मिती केली आहे. चीनचा हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
भारताने शनिवारी (२ सप्टेंबर) रोजी श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून आदित्य एल-१ हे यान प्रक्षेपित केले. इस्त्रोच्या पीएसएलव्ही एक्सएल (PSLV XL) या रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल-१ यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य एल-१ या अंतराळयानाला एल-१ बिंदूवर घेऊन जाईल. एल-१ हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे. म्हणजेच १५ लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर १५ लाख कोटी किलोमीटर आहे. आदित्य एल-१ यान तेथून सूर्याचे निरीक्षण करणार आहे. सूर्यावर यान लँड करणे सध्या तरी शक्य नाही. याआधी काही देशांनी सूर्याच्या अत्यंत जवळ यान पाठवून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, मात्र सूर्याच्या प्रचंड तापमानामुळे ही याने जळून खाक झाली.
चीनने हा सूर्य आण्विक संशोधनातून (Nuclear Research) निर्माण केला आहे. हा प्रकल्प २००६ मध्ये सुरु झाला. चीनने या कृत्रिम सूर्याला HL-2M असे नाव दिले आहे. हा सूर्य चीनच्या नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनसह साऊथ वेस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी बनवला आहे.
प्रतिकूल हवामानातही सौरऊर्जा टिकवून ठेवण्याचा या चिनी प्रकल्पाचा उद्देश आहे. या कृत्रिम सूर्याचा प्रकाश खऱ्या सूर्यासारखा तेजस्वी असेल. न्यूक्लियर फ्युजनच्या मदतीने तो तयार करण्यात आला आहे, ज्याला या प्रणालीद्वारेच नियंत्रित केले जाणार आहे.
कृत्रिम सूर्य बनवून चीनने विज्ञानाच्या बाबतीत अमेरिका, जपान, रशिया अशा अनेक देशांना मागे टाकले आहे. या सूर्याला बनवताना शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र वापरण्यात आल्याचे चीनच्या अहवालात म्हटले आहे. चीनचा हा कृत्रिम सूर्य १५ कोटी अंश सेल्सिअस तापमान गाठू शकतो. चीनचा कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा दहापट जास्त उष्ण असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
चीनच्या सिचुआन प्रांतात असलेल्या अणुभट्टीला अनेकदा कृत्रिम सूर्य म्हटले जाते. ती खऱ्या सूर्याप्रमाणेच उष्णता आणि वीज निर्माण करु शकते. चीनच्या दैनंदिन ऊर्जेच्या गरजा भागवण्याबरोबरच चीनच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अणुऊर्जेचा विकास उपयुक्त ठरेल, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत २२.५ अब्ज डॉलर्स आहे.
(PRAHAAR)