X Close
X
9819022904

‘नाणार’ आंदोलकांवरील गुन्हे मागे!


Mumbai:

आ. नितेश राणेंच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. आरे आंदोलकांवरील रविवारी गुन्हे मागे घेतल्यानंतर नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जावेत, अशी भूमिका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतली होती. यासंदर्भात त्यांनी सोमवारी सकाळीच ट्विट केले होते. या भूमिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत नाणार विरोधकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागील आठवडय़ात राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर रविवारी त्यांनी ‘आरे’तील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून, नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनामधील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. ‘आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले, आता नाणार आंदोलकांवरील गुन्हे पण मागे घ्या. कारण आरेतील पर्यावरणवाद्यांप्रमाणेच नाणारवासीय सुद्धा पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठी लढत होते’, अशी भावना नितेश राणे यांनी ट्विटरवर व्यक्त केली होती. त्यानंतर २४ तासांच्या आतच राणे यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

निसर्गरम्य कोकणात रासायनिक प्रक्रिया करणारे रिफायनरी प्रकल्पासह इतर कारखाने आणू नयेत, अशी भूमिका घेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाणार प्रकल्पाला कोकणवासीयांनी जोरदार विरोध केला होता. भाजप सरकारने कोकणात रिफायनरी प्रकल्प लादल्यानंतर शिवसेनेने रस्त्यावर विरोध केला होता. पण त्यावेळी सत्तेत असलेल्या शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतली होती. भाजप सरकारच्या काळात पर्यावरण खाते शिवसेनेच्या रामदास कदम यांच्याकडे, तर उद्योग खाते सुभाष देसाई यांच्याकडे होते. या दोन्ही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना विरोध न करताना परवाने दिले. बाहेर मात्र शिवसेना या प्रकल्पाला विरोध असल्याचे सोंग आणत होती. दुसरीकडे त्यावेळी भाजपचे सहयोगी सदस्य असलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांनी नाणारला जोरदार विरोध केला होता. कोणत्याही परिस्थितीत नाणार येणार नाही, अशीच त्यांची भूमिका होती. आ. नितेश राणे यांनी विधिमंडळात, तर निलेश राणे यांनी रस्त्यावर उतरून नाणार विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

शिवसेनेची रस्त्यावर भूमिका एक आणि कॅबिनेट व सरकारमध्ये वेगळी असल्याने शिवसेना कात्रीत सापडली होती. त्यामुळे शिवसेना कोकणात बॅकफूटवर गेली होती. याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेने हा नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या अटीवर भाजपसोबत युती केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोकणातील हा प्रकल्प बारगळला होता.

आता शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार येताच रविवारी आरे कॉलनीतील पर्यावरणवादी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. त्यानंतर काही तासांतच आरेप्रमाणे नाणार प्रकल्पावरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी कोकणातील कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सोमवारी नाणारमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे नाणार विरोधकांचे मोठे यश मानले जात आहे.