X Close
X
9819022904

‘कोविड-१९’ कोरोनाचे नवीन नाव


Mumbai:

जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला नवीन नाव दिले आहे. कोरोना विषाणूला आता ‘कोविड-१९’ असे अधिकृत नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. हा विषाणू ३१ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस एधानोम गेब्रेयेसुसने यांनी सांगितले की, कोरोना विषाणूला अधिकृत नाव देण्यात आले आहे. कोविड-१९ असे त्याचे नाव असून, को म्हणजे कोरोना, व्ही म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिसीज (आजार) असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जगासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. डिसेंबरमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर चीनमध्ये एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४२ हजारहून अधिक जणांना या आजाराची लागण झाली आहे.

आतापर्यंत जगातील २५ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. हा विषाणू नेमका कसा निर्माण झाला, याबाबत शास्त्रज्ञांकडून शोध सुरू आहे. या विषाणूची निर्मिती वटवाघुळांच्या माध्यमातून झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वटवाघुळानंतर हा विषाणू माणसांमध्ये साप व अन्य प्राण्यांच्या माध्यमातून पसरला असल्याची शक्यता आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आदी देशांसह इतर देशांतील औषधनिर्मिती कंपन्या कोरोनाच्या संसर्गावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

१३८ भारतीय संकटात
टोकियो : कोरोना विषाणूने (कोविड-१९) चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. त्यातच जपानच्या क्रूझवरही कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या क्रूझवर असणा-या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसग्रस्त डायमंड प्रिंसेज क्रूझ सध्या जपानच्या योकोहामा किना-यावर आहे. क्रूझमध्ये ३५०० प्रवाशांसह ३७११ जण आहेत. प्रवासी व कर्मचा-यांमध्ये १३८ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या क्रूझवर आता नवीन ३९ रुग्ण आढळले आहेत. जपानचे आरोग्यमंत्री कतसुनोबू काटो यांनी बुधवारी याबाबत ही माहिती दिली. आतापर्यंत या क्रूझवर १७४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.