X Close
X
9819022904

‘अंगणवाडी ताई’ होणार अधिक स्मार्ट, आता डिजिटल कारभार


anganwadi

मुंबई : शासनाकडून आता अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका व पर्यवेक्षिकांना स्मार्टफोन देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यासाठी सीमकार्डसह अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलही दाखल झाले आहेत. लवकरच या मोबाईलचे वाटप करून जूनमध्ये ऑनलाईन कामकाजाचे प्रशिक्षण सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभाग अधिकारी श्री. आरगे यांनी दिली.

पोषण अभियान अंतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून, सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका यांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत. केंद्र शासनाकडून अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पाठपुरावा होत असल्याने, गेल्या महिन्यात नवीदिल्ली येथे झालेल्या बैठकीत सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या होत्या. यासाठी मे. सिस्टेक आयटी सोल्युशन कंपनीकडून मोबाइल खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

देण्यात येणारे स्मार्ट फोन महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन देण्यापूर्वी हे नवीन अ‍ॅप कसे हाताळावे, त्यात माहिती कशाप्रकारे भरण्यात यावी या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पहिले जिल्हा प्रकल्प सहाय्यक, जिल्हा समन्वयक, त्यानंतर प्रत्येक प्रकल्प अधिकारी व शेवटी सेविकांना याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासनाने अंगणवाड्या सुरु केलेल्या आहेत. या अंगणवाडी केंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच त्यांचे वजन, उंची, त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना ११ प्रकारच्या विविध रजिस्टरमध्ये लिहून ठेवावा लागत होता. मात्र आता सेविकांना देण्यात येणा-या स्मार्ट फोनमध्ये विशेष अ‍ॅप असल्याने, त्यातच सर्व नोंदणी होईल. त्यामुळे अंगणवाडीतील रजिस्टर बाद होणार आहे. यामुळे ताईंचा कामाचा ताणही कमी होणार आहे.

बालकांची माहिती अ‍ॅपवरच भरणार

सर्वच अंगणवाडीसेविकांना आता लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे. त्यात शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची माहिती अ‍ॅपद्वारे ऑनलाइनद्वारे भरण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीकेंद्राचीही आता डिजिटलकडे वाटचाल सुरु झालेली आहे. मोबाइलमधील अ‍ॅपमध्ये बालकाच्या वैयक्तिक माहितीसोबतच त्याचे लसीकरण कधी झाले, आगामी लसीकरण कधी आहे याबाबत त्यांच्या पालकांना मॅसेज पाठविण्यासाठी बालकांच्या पालकांचेही मोबाइल नंबर घेण्यात येणार आहेत.

(PRAHAAR)