X Close
X
9819022904

१ फेब्रुवारीपासून टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा दिवा


taxi

प्रवाशांचा मनस्ताप होणार दूर, भाडे घेण्यास टॅक्सी उपलब्ध आहे का, हे समजणार

मुंबई : टॅक्सी, टॅक्सी असे करत दुरुन येणा-या टॅक्सीला थांबवावे लागण्याची वेळ मुंबईतील गर्दीच्या अनेक ठिकाणी प्रवाशांवर येते. टॅक्सी मिळवणे हे मुंबईकरांसाठी एक दिव्य पार करण्यासारखेच असते. कारण लांबून येणा-या टॅक्सीला हात दाखवल्यानंतर अनेक टॅक्साचालक भाडे नाकारतात, तर कधी टॅक्सीमध्ये आधीच प्रवासी असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. पण आता मात्र हा मनस्ताप लवकरच दूर होणार आहे. कारण आता भाडे स्वीकारणारीच टॅक्सी थांबवणे अगदी सोयीचे होणार आहे. टॅक्सीवर आता यापुढे हिरवा, लाल आणि पांढरा असे तीन दिवे असणार असून हिरवा दिवा चालू असेल तर टॅक्सी उपलब्ध असल्याचे प्रवाशांना समजणार असून ती टॅक्सी लगेच प्रवाशांना थांबवता येणार आहे. १ फेब्रुवारीपासून मुबंईत या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

मुंबईकरांना सहज टॅक्सी उपलब्ध व्हावी यासाठी २०१२ मध्ये यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवत पुढची प्रक्रिया करेपर्यंत २०१४ उजाडले. त्यानंतर दिव्यांवर इंग्रजीसह मराठीतही शब्द लिहिले जावे यात पाच वर्षे आणखी गेले. पण आता मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीतील सर्व अडथळे दूर झाल्याने १ फेब्रुवारीपासून टॅक्सीवर तीन दिवे लावणे बंधनकराक होणार आहे. वाहतूक आयुक्त शेखर चन्ने यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.

टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा असे तीन दिवे असतील. हिरवा दिवा सुरु असल्यास टॅक्सी भाडे घेण्यास उपलब्ध आहे असे प्रवाशांनी समजावे. तर लाल दिवा असेल तर त्यात प्रवासी आहे असे समजावे. त्याचवेळी पांढरा दिवा पेटता असेल तर टॅक्सी सध्या भाडे स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसेल असा त्याचा अर्थ होईल. हे दिवे एलईडी असणार असून प्रत्येक दिव्याचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून लिहिणे बंधनकारक असणार आहे. तर तिन्हीपैकी एक दिवा पेटता ठेवणेही गरजेचे असणार आहे. या नव्या नियमामुळे प्रवाशांचा मनस्ताप दूर होईल असे म्हटले जात आहे.

दरम्यान मुंबई शहरात सुमारे ४३,५०० काळ्या-पिवळ्या टॅक्सी तर सुमारे अडीच लाख ऑटो रिक्षा आहेत. तर संपूर्ण राज्यात मुंबईसह ६५,५९१ नोंदणीकृत टॅक्सी आणि ९.७५ लाख नोंदणीकृत ऑटो रिक्षा आहेत.

सध्या अशा प्रकारे दिवे बसवणे टॅक्सी आणि रिक्षांसाठी अनिवार्य नाही. मात्र, काही कॅबवर पिवळ्या रंगाचे दिवे बसवण्यात आलेले आहेत.

रिक्षावरही लवकरच दिवे
टॅक्सी उपलब्ध करुन घेण्यासाठी मुंबईकरांनी जशी कसरत करावी लागते त्यापेक्षा अधिक कसरत रिक्षा मिळवण्याकरता करावी लागते. रिक्षावाले मोठय़ा संख्येने भाडे नाकारतात. त्यामुळे रिक्षावरही असे दिवे बसवण्याचा विचार सुरु असल्याचेही चेन्ने यांनी सांगितले आहे. मात्र टॅक्सीला कसा प्रतिसाद मिळतो हे तपासल्यानंतरच रिक्षासंबंधीचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(PRAHAAR)