X Close
X
9819022904

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, संभाजीनगर


Mumbai:

सेवाव्रती: शिबानी जोशी

संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची उभारणी १९८९ मध्ये झाली. त्यामागे हेतू होता की, गरीब, वंचित, दुर्बल घटकांना नाममात्र दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवायची; परंतु रुग्णांची सेवा करताना अनेक सामाजिक प्रश्न तिथल्या कार्यकर्त्यांना दिसले आणि हे प्रश्न सोडवल्याशिवाय आरोग्य सुधारणार नाही. हे एक दुष्टचक्र आहे. ते थांबवण्याची गरज असल्यामुळे आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला सबलीकरण अशा ६ विषयांवर काम करण्याची गरज आहे, हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर दुसऱ्या एका संस्थेची स्थापना झाली. त्याचं नाव ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’, संभाजीनगर. १९८९ च्या ऑगस्ट महिन्यात डॉ. हेडगेवार रुग्णालय सुरू झालं आणि त्यानंतर लगेचच डिसेंबर १९८९ पासून या कार्याची पायाभरणी झाली.

सर्वात प्रथम अर्थातच ‘आरोग्य’ हा विषय हातात घेण्यात आला आणि संभाजीनगरमधल्या सेवावस्त्या तसेच संभाजीनगर, जालना आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य केंद्र उभारून घरापर्यंत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. हे करत असताना तिथले सामाजिक, कौटुंबिक प्रश्न दिसून आले आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातही काहीतरी कार्य करावे, असे ठरवण्यात आलं. शिक्षण म्हणजे केवळ शालेय पाठ्यपुस्तकी शिक्षण नाही तर भारतीय बाल शिक्षण. ते कसं असावं तर स्वभाषा, स्वदेश आणि स्वसंस्कृती अनुभवजन्य, निसर्ग निगडित, अनौपचारिक या मूल्यांवर आधारित असावं ही भावना ठेवून पहिली बालवाडी संभाजीनगर शहरात १९९६ साली स्थापन करण्यात आली. ती म्हणजे ओंकार बालवाडी.

सुरुवातीला छोट्याशा भाड्याच्या जागेत सुरू झालेली बालवाडी २०१४ साली स्वतःच्या इमारतीमध्ये आता भरत आहे. दोन एकराच्या विस्तीर्ण अशा जागेमध्ये असलेल्या ओंकार बालवाडी बालशिक्षण व संशोधन प्रकल्प असं नाव देण्यात आलं. तीन ते पाच वर्षे वयोगटातल्या मुलांना येथे प्रवेश दिला जाऊ लागला. पहिली दोन वर्षे या मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल दिली जात नाही. केवळ गोष्टी, खेळ, चित्रकला, हस्तकला, गायन या माध्यमातून त्यांच्यावर संस्कारमूल्य शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास करण्यावर भर दिला जातो. यामध्ये आपले सर्व सण साजरे करणे, श्लोक-पठण, महामानव, थोरांच्या गोष्टी सांगणं, मुलांच्या बोधात्मक विकासासाठी अनेक खेळ विकसित केलेले आहेत. मुलांना आवडतील असे उपक्रम हाती घेतले जातात. या प्रकल्पामध्ये लहान मुलांसाठी अद्ययावत वाचनालय आहे.

खरंतर कुठेही आपल्याला तीन ते सहा वयोगटातल्या मुलांसाठी वाचनालय दिसत नाही; परंतु ओंकार बालवाडीमध्ये वैविध्यपूर्ण पुस्तकं आणि खेळांनी सजलेलं वाचनालय मुलांसाठी तसेच पालकांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. ओंकार बालवाडीमध्ये दरवर्षी १५० ते १७० मुलं शिक्षण घेतात, तर संभाजीनगर शहरातल्या इतर सेवावस्त्यांमधल्या तीन बालवाड्या मिळून सरासरी १५० ते १७० मुलं शिक्षण घेतात. साडेचार वर्षांनंतर मुलांचा विद्यारंभ संस्कार केला जातो आणि त्यांच्या हातात पेन्सिल दिली जाते. त्यानंतरही मुलांमध्ये स्पर्धा नाही, परीक्षा नाही. हसत खेळत शिक्षण दिलं जातं. मुलांचं मूल्यमापन करून पालकांना ते दाखवलं जातं. त्याशिवाय विद्याभारती, देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानसोबत ओंकार बालवाडी संलग्नित आहे.

पंचकोश आधारित शिक्षण ही विद्याभारतीची संकल्पना आहे. यावर आधारित बालवाडीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. आपल्या वेद, उपनिषद, पतंजली, प्राचीन ग्रंथामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, मानवाचा विकास पंचकोशांमुळे होतो आणि हे पंचकोश म्हणजे अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष. ‘मातृहस्तेन् भजनम् मातृ मुखेमुखेन् शिक्षणम्’ घरात शाळा, शाळेत घर हे बालवाडीचे ब्रीदवाक्य आहे. बाल शिक्षणासोबतच शिक्षक, प्रशिक्षण व पालक प्रबोधन या दोन महत्त्वाच्या गोष्टीही ओंकार बालवाडीकडून केल्या जातात.

आतापर्यंत साडेतीन हजाराच्यांवर अंगणवाडी, बालवाडी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच श्रेष्ठ बालशिक्षण व पंचकोश आधारित बालाजी शिक्षण कसे असावे, यासाठी समाजप्रबोधन, धमाल नगरी आनंद विहार शिबीर, शिशू शिक्षण परिषद, तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन, व्याख्यान अशा उपक्रमांतून केले जाते. मागील २६ वर्षांमध्ये पंधरा हजाराच्यांवर लोकांनी बाल शिक्षण कसे असावे, हे विविध उपक्रमांतून समजून घेतले आहे. मध्य महाराष्ट्रातील मातृभाषेतील शिक्षणाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून आज ओंकार बालवाडी नावारूपाला आलेली आहे. महाराष्ट्रासोबतच गोवा राज्यातही शंभर मास्टर ट्रेनर तयार करण्याचे प्रशिक्षण बालवाडीने दिलेले आहे.

शासनाच्या ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमामध्ये अभिनव कल्पना घेऊन सतत तीन वर्षं बालवाडीचा सहभाग राहिलेला आहे. साधारणपणे महाराष्ट्रातून दर महिन्याला २५ ते ४० लोक येऊन बालवाडीला भेट देतात. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. मधुश्री सावजी करत आहेत. त्या खरंतर व्यवसायाने डॉक्टरी पेशा करत होत्या; परंतु नंतर त्यांनी डॉक्टरी व्यवसाय सोडून पूर्णपणे बालशिक्षणाला वाहून घेतलं आहे. त्यांच्या सृजनात्मक विचारातून असे प्रकल्प राबवले जात आहेत.

हेडगेवार रुग्णालयात बौद्धिक पातळी कमी असलेले किंवा तशाच प्रकारच्या अन्य मानसिक आजार किंवा अपंगत्व असलेली मुलं घेऊन पालक येत असत आणि त्यांना नॉर्मल शाळेत घेत नाहीत, अशी व्यथा मांडत असत. ओंकार बालवाडीमध्ये प्रशिक्षण सुरू करण्यात आले व अशा विशेष दिव्यांग मुलांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. हळूहळू त्यांची प्रगती पाहून अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन ओंकार बालवाडीत येऊ लागले आणि यातूनच २०१० साली विहंग विशेष मुलांची शाळा स्थापन झाली. आज सेरेब्रल पालसी,ऑटिझम, एडी, एचडी डाउन सिंड्रोम, स्वमग्न असलेली ६५ मुलं शाळेत शिकत आहेत. या मुलांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विविध शासकीय योजना राबवल्या जातात. तसेच म्युझिक थेरपी, एक्वा थेरपी, फिजिओथेरपीसारख्या थेरपीसही मुलांना दिल्या जातात.

मराठवाड्यातील पहिले सेंसरी गार्डन व एक्वा थेरपी पूल विहंग शाळेमध्ये तयार झालेले आहे. या मुलांना समाजाने स्वीकारण्याची गरज आहे. तसेच अशा मुलांसाठी सरकारी कार्यालये, सार्वजनिक शौचालय, मॉल, चित्रपट गृह येथे खास व्यवस्था नसल्यामुळे ही मुलं अशा ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यासाठीदेखील सरकार दरबारी संस्थेतर्फे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या मुलांना विशिष्ट प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाते. अत्यंत अल्प शुल्क आकारणी करून या मुलांना शिक्षण दिले जाते. ते देण्याची सुद्धा ऐपत नसेल, तर अशा मुलांसाठी काही योजना तसेच दात्यांकडून मदतही मिळवून दिली जाते. तीन वर्षांपासून २१ वर्षे वयापर्यंतची मुलं या शाळेत येतात. या मुलांना त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार शालेय शिक्षणही दिलं जातं. तसंच कौशल्य विकास आधारित काही कामेदेखील शिकवली जातात. या शाळेमध्ये १५ जणांचा विशेष प्रशिक्षित स्टाफ आहे. आज या शाळेचे संभाजीनगरमध्ये इतकं चांगलं नाव झालं आहे की, तिथे मुलांच्या अॅडमिशनसाठी वेटिंग लिस्ट झाली आहे. जागा मोठी असली तरी सुद्धा या मुलांसाठी विशिष्ट जागेची गरज असते. एका वर्गात आठ ते दहा मुलं सामावू शकतात.

हेडगेवार रुग्णालयाची आरोग्य केंद्रे गावोगावी सुरू झाल्यावर तिथे असं लक्षात आलं की, किशोरवयीन मुलींनाही अनेक समस्या आहेत. त्यांना शारीरिक तसेच मानसिक गरजा, भावभावना यांचं वैज्ञानिक ज्ञान असण्याची गरज आहे. त्यातूनच “किशोरी विकास प्रकल्प” असा एक मोठा उपक्रम हाती घेण्यात आला. हा उपक्रम संभाजीनगर शहर तसेच जिल्ह्यातील गावागावांतील सर्व केंद्रांवर राबवला जातो. यासाठी विविध शिबीर, वर्ग, गट चर्चा, व्हीडिओज दाखवले जातात. तसेच शाळांमध्ये जाऊन सुद्धा किशोरवयीन मुलींमध्ये जागृती निर्माण केली जाते. आसपासच्या जवळजवळ ५० शाळांमध्ये जाऊन लेक्चर्स आयोजित केली जातात. त्यांना आकर्षण आणि प्रेम यातील फरक समजावला जातो.

मासिक पाळी, त्यावेळची स्वच्छता, शरीरात होणारे बदल, मानसिक आरोग्य, शिक्षणाचे महत्त्व, कौशल्याधारित प्रशिक्षण दिलं जाते. दरवर्षी जवळपास दोन ते तीन हजार मुलींमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणीव जागृती निर्माण केली जाते. किशोरी विकास प्रकल्पाचे काम संभाजीनगर शहरातील २३ वस्त्यांमध्ये व वीस खेड्यांमध्ये चालते. गावांमध्ये ज्या ठिकाणी हेडगेवार रुग्णालयाचे आरोग्य उपकेंद्र चालते, त्या ठिकाणी हे उपक्रम राबवले जातात. त्यानंतर या किशोरवयीन मुली युवा अवस्थेत गेल्यानंतर त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण, कौशल्य विकास यातून त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील, अशा प्रकारचे प्रशिक्षण दिलं जाते. दहावी-बारावीतील मुलांसाठीसुद्धा शिक्षण दिल जातं. तसेच चांगले कोचिंग क्लास उपलब्ध करून दिले जातात. किशोरवयीन मुलींप्रमाणेच मुलांनाही प्रबोधन करण्याची गरज आहे, हे लक्षात आल्यावर अशाच प्रकारचा किशोर विकास प्रकल्प किशोरवयीन मुलांसाठी देखील हाती घेतला.

विद्यार्थी विकास प्रकल्प संभाजीनगर शहरातील १४ वस्त्यांमध्ये चालतो. तसेच मुलांना दोन तास शैक्षणिक महत्त्व मार्गदर्शन करण्यासाठी सिद्धार्थ विद्यार्थी विकास प्रकल्प राबवला जातो. कारण किशोरवयीन मुलांनासुद्धा शारीरिक, सामाजिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. व्यसनाधीनता, अभ्यासात दुर्लक्ष, वाकडा मार्ग अवलंबन यातून सन्मार्गावर आणण्यासाठी मुलींप्रमाणेच मुलांसाठीदेखील लेक्चर्स, शिबीर, डॉक्युमेंटरी दाखवणे अशा उपक्रमातून सजगता निर्माण केली जाते. अशाप्रकारे प्रशिक्षित झालेली मुलं संस्थेची नंतरही भविष्यात कायमस्वरूपी जोडली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापैकी काही मुलं त्यानंतर बालवाडीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी येतात किंवा अन्य काही उपक्रमांमध्ये संस्थेमध्ये कार्य करायला येत राहतात. अशी देखील अनेक उदाहरणं आहेत. सर्व बालवाड्या मिळून २५ जणांचा प्रशिक्षित स्टाफ सामाजिक भावनेने तळमळीने काम करतो. त्याशिवाय किशोरी विकास प्रकल्पासाठी दहाजण आणि किशोर प्रकल्पासाठी दहाजण कार्यरत आहेत.

आता नवीन शैक्षणिक धोरण येत आहे आणि त्यानुसार बालवाडीचेदेखील अभ्यासक्रम ठरवले जाणार आहेत. त्यात सांगितलेली काही धोरणे आधीपासूनच इथल्या बालवाड्यांमध्ये राबवली जात आहेत. शिक्षणामध्ये देखील नवनवीन तंत्र विकसित होत आहेत. या सर्वांचं अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी तसेच शिक्षकांना कायम अद्यावत ठेवण्यासाठी प्रशिक्षण प्रक्रिया सुरू करण्याची, यानंतर संस्थेच्या शिक्षण विभागाची योजना आहे.

संभाजीनगर आणि आसपासच्या भागातील वैद्यकीय सुविधांचा अभाव पाहून सुरू झालेल्या हेडगेवार रुग्णालयातमध्ये येणाऱ्या समाजातल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या समस्या पाहून संघ कार्यकर्त्यांनी शिक्षण, महिला सबलीकरण, कौशल्य विकास अशा क्षेत्रात देखील काम करण्याचं मनावर घेतलं. कारण सुदृढ समाज फक्त शारीरिक सुदृढ नाही, तर तो मानसिकदृष्ट्या सुदृढही असला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची पक्की भावना आहे. त्यानुसार शिक्षण या विषयावर बालवाड्या, किशोरी विकास प्रकल्प, किशोर विकास प्रकल्प आणि दिव्यांगांसाठी शाळा सुरू करून दुर्बल, वंचित घटकातील कुटुंबातल्या मुलांना राष्ट्रीय मूल्याधारित शिक्षण देऊन सुदृढ समाज घडवण्याचा प्रयत्न या विभागाकडून होत आहे.

joshishibani@yahoo. com