X Close
X
9819022904

सातवा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला


Mumbai:

प्रहार वेब टीम

नवी दिल्ली : सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी ९१८ उमेदवार रिंगणात असून सुमारे १० कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शत्रुघ्न सिन्हा, रविशंकर प्रसाद, अभिनेते सनी देओल, मनोज सिन्हा, मीरा कुमार, किरण खेर, सुनील जाखड यांच्यासह इतर दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

सातव्या टप्प्यामध्ये बिहार (८), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (३), मध्य प्रदेश (८), पंजाब (१३), उत्तर प्रदेश (१३), पश्चिम बंगाल (९)या राज्यांसह चंदीगड (१)या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना कॉँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे.

अशा होणार लढती

बिहारच्या पाटणासाहिब मतदारसंघातून नुकतेच कॉँग्रेसवासी झालेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे मैदानात आहेत. त्यांच्या विरोधामध्ये भाजपने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. मागील दोन निवडणुका भाजपकडून जिंकलेले शत्रुघ्न सिन्हा यंदा हॅट्ट्रीक करू शकणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघामधून भाजपने अभिनेते सनी देओल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसतर्फे विद्यमान खासदार सुनील जाखड हे मैदानात आहेत. चंदीगडमधून भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर आणि कॉँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पवन कुमार बन्सल यांच्यामध्येही चुरशीची लढत होत आहे.

याशिवाय केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा (गाझीपूर), अनुप्रिया पटेल (मिर्झापूर), हरसिमरत कौर बादल (भटिंडा), राम कृपाल यादव (पाटलीपुत्र), भोजपुरी अभिनेते रवीकिशन (गोरखपूर), लालु प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती (पाटलीपुत्र ), लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार (सासाराम), झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (डुमका), माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भुरिया (रतलाम), पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल (फिरोझपूर), कॉँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी (आनंदपूर साहिब), ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (डायमंड हार्बर) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस(कोलकाता दक्षिण)हे महत्वाचे नेते मैदानात आहेत.

एडिआर रिपोर्ट ?

कॉँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे ४५ पैकी ४०(८९%) उमेदवार करोडपती आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे ४३ पैकी ३२ (८४%) उमेदवार आहेत. तिस-या क्रमांकावर ६४ टक्के करोडपती असलेले आप आहे. या पक्षाच्या १४ पैकी ९ उमेदवारांकडे एक कोटीपेक्षा अधिक संपत्ती आहे. बसपा २८ टक्के तर १९ टक्के अपक्ष उमेदवारही करोडपती आहेत. या टप्प्यातील उमेदवारांकडील सरासरी संपत्ती ४.१९ कोटी रुपयांची आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

या टप्प्यातील १९ टक्के (१७०) उमेदवारांच्या विरोधात फौजदारी खटले आहेत. यापैकी १२७ जणांवर (१४ टक्के) गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. असे सर्वाधिक उमेदवार ४३ पैकी १८ भाजपचे (४२ टक्के) आहेत. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे ४५ पैकी १४ ( ३१ टक्के), आपचे २१ टक्के, बसपा (१५ टक्के) तर अपक्ष ९ टक्के यांचा क्रमांक लागतो, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) अहवालात दिली. ५९ पैकी ३३ मतदारसंघ अतिसंवेदनशील जाहीर केले आहेत.