X Close
X
9819022904

संसदेतील गोंधळी


Mumbai:

हेरगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘पेगॅसस’ या इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे राजकीय नेत्यांसह अनेकांच्या मोबाईलचे हॅकिंग आणि टॅपिंग होत असल्याच्या मुद्द्यावरून म्हणजेच फोन ‘हॅक’प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मोठा गदारोळ माजल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस कोणत्याही विशेष कामकाजाविना वाया गेले असेच म्हणावे लागेल. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांना ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आले.

हेरगिरी तंत्रज्ञानाच्या आधारे देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ अशा ३०० व्यक्तींचे फोन ‘हॅक’ करण्यात आल्याचा गौप्यस्फोट ‘द वायर’सह जगभरातील १६ माध्यम संस्थांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. संसदेचे कामकाज सुरू होण्याआधीच लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘पेगॅसस’ प्रकरणावर केंद्र सरकारला जाब विचारला जाईल, असे स्पष्ट केले होते. ‘पेगॅसस’ व कोरोनासंदर्भात संसदेत रणनीती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठकही झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आदी प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. लोकसभेत काँग्रेसचे हिबी एडन, मणिकम टागोर आदींनी स्थगन प्रस्ताव दिला होता.

राज्यसभेत आम आदमी पक्षाचे संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर राय, काँग्रेसचे वेणुगोपाल यांनी २६७ अंतर्गत नोटीसही दिली होती आणि अन्य कामकाज स्थगित करून ‘पेगॅसस’ प्रकरणावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, दोन्ही सभागृहांमध्ये ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांची घोषणाबाजी वाढत गेली. राज्यसभेत पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलक घेऊन विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींसमोरील हौदात निदर्शने केली. राज्यसभेत विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे कामकाज प्रारंभी तीनदा तहकूब झाले. मात्र दुपारी २ वाजल्यानंतर राज्यसभेत कोरोनाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात आल्याने थोडेबहुत कामकाज झाले.

विशेष म्हणजे, काँग्रेससह अन्य विरोधकांनी पाळत प्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन कामकाज रोखून धरण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. कारण ‘पेगॅसस’ हॅकिंग आणि केंद्र सरकार यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसून या विषयावर गदारोळ घालण्यापेक्षा विरोधकांनी चर्चा घडवून आणण्याचा आग्रह धरायला हवा होता. तसेच त्यासाठी विरोधकांनी संसदेच्या नियमित प्रक्रियेचा अवलंब करायला हवा होता. विरोधकांनी केवळ आक्रस्ताळेपणा करून कोणतेही कामकाज करू न देणे म्हणजे केवळ जनतेच्या पैशाचा अपव्यय नसून लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अनादर होत आहे, असे म्हटले पाहिजे.

‘एनएसओ’ या इस्रायली कंपनीने ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान विकसित केले असून, जगभरातील ४५ पेक्षा जास्त सरकारांना ते विकण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. ‘एनएसओ’ कंपनी ‘पेगॅसस’ तंत्रज्ञान फक्त सरकारांनाच विकते, तर मग प्रश्न इतकाच आहे की, ही सरकारे कोणती आहेत? देशात या तंत्रज्ञानाचा वापर झाला असेल आणि केंद्र सरकारने त्याचा वापर केल्याचा इन्कार केला असेल, तर या मागे अन्य कुणाचा हात आहे काय? याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.

राष्ट्रीय सुरक्षा व दहशतवादाशी संबंधित बाबींमध्येच फोन टॅप करण्याची परवानगी दिली जाते. मग, देशातील विविध पक्षांचे नेते, मंत्री आदींचे फोन हॅक होत असल्याच्या अरोपांमध्ये तथ्य आहे, असे म्हणता येणार नाही. खरं म्हणजे, देशासमोर सध्या काेरोना महामारीसारखे फार मोठे संकट उभे ठाकले असून त्याला रोखण्यासाठी सर्व स्तरावर विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि हे करताना सत्ताधारी आणि विरोधक, राज्यातील सरकारे, विविध यंत्रणा, समाजसेवी संस्था आदी सर्वांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या भीषण संकटामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनुत्पादन, बेरोजगारी अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

देशासमोर आणि देशवासीयांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून त्यातून मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी विरोधकांना सोबत घेऊन मार्ग काढण्यासाठी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीवरही काँग्रेस, तृणमूल या विरोधी पक्षांनी बहिष्कार घालून आपला कमकुवतपणा सिद्ध केला असे म्हणावे लागेल. त्यामुळेच कोरोना महामारीच्या व्यवस्थापनावरून आरोप करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची सूचना पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना केली. तसेच ‘सत्य सतत जनतेपर्यंत पोहोचवा. सरकारच्या कामांची माहिती द्या’, असेही पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले. हे करताना त्यांनी काँग्रेसवर योग्य शब्दांत टीकेची झोड उठविली.

‘काँग्रेस सर्व ठिकाणी संपत चालली आहे. पण स्वतःची चिंता करण्याऐवजी त्यांना आपली चिंता अधिक आहे’, असा मार्मिक टोला मोदींनी लगावला आणि या संपत चाललेल्या पक्षाचे कान उपटले. तसेच ‘कोरोना महामारी आपल्यासाठी राजकारण नाही. हा माणुसकीचा मुद्दा आहे. यापूर्वी महामारीच्या काळात महामारीने कमी आणि उपासमारीने अधिक मृत्यू होत होते. आपण अशी वेळ येऊ दिली नाही’, असे मोदी म्हणाले. एकूणच चाणाक्ष मोदींनी संसदेतील गोंधळी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले आहेत.