X Close
X
9819022904

व्यक्तिविशेष : अल्लादिया खाँ (१० ऑगस्ट १८५५-१६ मार्च १९४६)


Mumbai:

कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक. खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण, दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले. खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोटय़ाशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. खाँसाहेबांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ होते; परंतु त्यांच्या माता-पित्यांच्या अनेक अपत्यांतील हे अपत्य वाचले, म्हणून त्यांना ‘अल्लादिया खाँ’ (अल्लाने जगविलेले मूल) म्हणू लागले.

खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमद खाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. अल्लादिया खाँ चौदा-पंधरा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील टोंक येथे वृद्धापकाळी मृत्यू पावले. त्यामुळे त्यांचे शिक्षण चुलते जहांगीर खाँ यांच्याकडे झाले. अल्लादिया खाँनी प्रथम चार-पाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सात-आठ वर्षे ख्यालगायकीचे पराकाष्ठेच्या निष्ठेने शिक्षण घेतले. यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इत्यादी प्रदेशांत व थेट नेपाळपर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला.

पुढे ते आमलेटा संस्थानात असताना एकदा अतिगायनामुळे त्यांचा आवाज जो साफ बसला, तो जवळजवळ दोन वर्षापर्यंत. त्यामुळे पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी त्यांनी निर्माण केली. १८९१च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदाबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापुरास शाहू महाराजांच्या आश्रयाला स्थायिक झाले, ते १९२२ मध्ये महाराजांचा अंतकाल होईपर्यंत. १९२२ पासून १९४६ पर्यंतची २४ वर्षे त्यांनी मुख्यत: शिकविण्यात मुंबईस काढली. खाँसाहेब यांचा मुंबईत मृत्यू झाला. त्यांची कबर मुंबईला ठाकुरद्वारला रूपावाडी येथे असून, कोल्हापुरास देवल क्लबसमोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.

खाँसाहेबांच्या पूर्वी महाराष्ट्रात अनेकविध गायनशैली प्रचलित होत्या, पण त्यातल्या कोणत्याही गायकीपेक्षा ही गायकी स्वतंत्र होती. मूळच्या धृपद-अंगामुळे येणारा बोझ, स्वररचनेचा पेचदारपणा, लयकारीचा बिकटपणा, अनेकविध रागांचा अनवटपणा अथवा मिश्रता, चिजांचे नावीन्य, अचाट दमसास, त्यामुळे येणारा एकसंध अतूटपणा आणि गोळीबंद गमक-अंगाचे प्राधान्य ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्टय़े होती. त्यांचा प्रत्येक स्वर लयकारीने झेलला जात असे आणि त्यांच्या तानेची मांडणी तर विलक्षण व अनपेक्षित असे. त्यामुळे त्यांची गायकी ऐकण्यापूर्वी श्रोत्यांच्या बौद्धिक पूर्वतयारीची नितांत अपेक्षा असे. त्यांच्या तनाइतीतले एक वैशिष्टय़ म्हणजे, रागाच्या जीवस्वराला मध्येच दिला जाणारा अतिशय मोहक झोल किंवा दुस-या एखाद्या स्वरावर होणारा ठेहराव व तेथून अत्यंत अनपेक्षितपणाने तानेचा समेपर्यंत अवसानाने होणारा प्रवास. त्यांच्या एकंदर गायकीमध्ये चीज, आलाप, तान, बोलताना इत्यादी अंगे एकापुढे एक पृथक ठेवलेली न वाटता, ती एकमेकांमध्ये बेमालूमपणे एकजीव होऊन जात आणि चिजेला अथवा रागाला पूर्णोद्गाराचे स्वरूप येई.

खाँसाहेबांचा स्वभाव निगर्वी, गुणग्राहक आणि वृत्ती अलिप्तपणाची होती. खाँसाहेबांनी आपल्या वडिलांचे एहमदजींचे नाव गोवून ब-याच सुंदर चिजा बांधलेल्या आहेत. त्यांच्या मुलांपैकी दोन मुलगे मंजी खाँ आणि भुजी खाँ हेही गुणी गायक व शिक्षक होते. खाँसाहेबांना दहा-बारा हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक ‘कोठीवाले’ गायक होते. खाँसाहेबांच्या शिष्यशाखेत त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळीग्राम, नथ्थन खाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला, मोहनराव पालेकर इत्यादी सुविख्यात कलावंत मंडळी आहेत.

(संदर्भ : मराठी विश्वकोश)