X Close
X
9819022904

विशेष लेख : राहुल गांधी शिष्टाचार कधी पाळणार?


Mumbai:

सुरेंद्र हसमनीस

वागण्या-बोलण्यात किमान शिष्टाचार असावा याची जाणीव खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना नसावी याचे सर्वसामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस उमेदवारांसाठी भाषण करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय संकेताच्या सा-या मर्यादा ओलांडून बेतालपणे टीका केली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून त्यामुळे तरुण वर्गात असंतोष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला रोजगार देतात की नाही याची सहा महिने हे तरुण वाट बघतील, त्यानंतर मात्र त्यांना रोजगार नाही मिळाला, तर ते मोदींना काठीने चोप देतील असे वक्तव्य राहुल गांधी यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत केले. आपण काहीतरी चुकीचे बोलून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करीत आहोत याचे कसलेही वैषम्य राहुल गांधी यांना वाटू नये हे खेदजनक आहे.

राहुल गांधी यांच्या घराण्यात अनेक वर्षापासून पंतप्रधानकी चालत आली आहे. राहुल यांचे वडील राजीव गांधी हेही पंतप्रधान होते. राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी याही पंतप्रधान होत्या. याच्याही मागे जायचे ठरविले तर राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही प्रदीर्घ काळ पंतप्रधानपद भूषविले होते. गांधी-नेहरू घराण्याचा त्याग सर्व परिचित आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या लढायांत पंडित नेहरू तब्बल नऊ वेळा तुरुंगात गेले होते. पण म्हणून नेहरू यांनी त्याचा कधी डंका पिटला नाही. सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांना नेस्तनाबूद करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात थेट लष्कर घुसविले होते. या त्यांच्या निर्णयाची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख सुरक्षा रक्षकांनीच त्यांची हत्या केली होती. अर्थात ही इंदिरा गांधी यांची एक बाजू म्हणावी लागेल. १९७१ सालची लोकसभा निवडणूक काँग्रेसने जिंकल्यानंतर इंदिरा गांधी यांनी हरियाणातील तत्कालीन जनता पक्षाचे नेते व मुख्यमंत्री भजनलाल यांच्यासह त्यांचे सारे मंत्रिमंडळच काँग्रेसमध्ये दाखल करून घेतले होते. आयाराम-गयाराम ही राजकीय संकल्पना या घटनेनंतरच दृढ झाली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या कर्तृत्वाचा आढावा घ्यायला गेल्यास एक मोठे शून्य आपल्या हाती लागते. राहुल यांचे काका संजय गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर राहुल यांचे वडील राजीव गांधी यांनीही विजयासाठी अमेठीलाच पसंती दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांना मात्र अमेठीचे शिवधनुष्य पेलवले नाही. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. आपण पराभूत होणार हे राहुल गांधी यांनाही बहुधा मान्य असावे. त्यामुळेच त्यांनी केरळमधील काँग्रेससाठी सुरक्षित असलेला मतदारसंघ निवडून तिथूनही ते निवडून आले. त्यामुळेच आज ते लोकसभेचे खासदार आहेत. अन्यथा त्यांना राज्यसभेतून खासदारकी मिळवावी लागली असती. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे लोकसभेत पडसाद उमटताच त्यांनी काहीतरी थातूनमातूर खुलासा करून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मी लोकसभेत जे बोलतो ते भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना आवडत नाही.

मला बोलूच द्यायचे नाही असे भाजप नेत्यांचे डावपेच आहेत. पण संसदेचे आवार असो वा जाहीर सभा असो, देशाच्या पंतप्रधानांचा आपल्याकडून अपमान होणार नाही, एवढे भान राहुल यांनी ठेवणे गरजेचे आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राहुल गांधी यांनी वारंवार नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा उल्लेख केला. पण त्यात त्यांचा आदरभाव दिसत होता. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतरही गुजरातमध्ये जाऊन काँग्रेसला पाठिंबा देणा-या जनतेचे त्यांनी आभार मानले होते. यातूनही त्यांचा आदरभाव दिसला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांवर त्यांनी केलेली टीका मतलबी आणि जाणूनबुजून मोदी यांचा अपमान करणारी वाटली. पंडित नेहरू यांनीही प्रदीर्घ काळ पंतप्रधानपद भूषविले. पण तत्कालीन सर्वच पक्षांच्या बडय़ा नेत्यांशी त्यांचे संबंध आपुलकीचेच होते. इंदिरा गांधी संतापी होत्या, खुनशी नेत्या अशीही त्यांची एक ओळख होती. पण त्यावेळच्या सर्वच पक्षांतील मान्यवर नेत्यांशी त्यांचे संबंध जिव्हाळ्याचेच होते. आणीबाणीत अनेक विरोधी पक्षांतील मातब्बर नेत्यांना त्यांनी तुरुंगात डांबले, पण या नेत्यांची बडदास्त त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कर्तबगारीनुसार ठेवली जाईल, याचीही काळजी त्या वारंवार घेत असत.

कुठेही जायचे, समोर गर्दी दिसली की विरोधकांवर बेदरकारपणे टीका करायची, त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर अनेक ठिकाणी मानहानीचे खटले सुरू आहेत. भिवंडी येथे तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बेछुटपणे टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर खटला सुरू आहे. त्यासाठी त्यांना स्वत: भिवंडी न्यायालयात उपस्थित राहावे लागते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांनी केलेली टीका अनेकांची मने दुखावून गेली होती. इंदिरा गांधी कशाही असल्या तरी सावरकर यांच्यावर त्यांची निष्ठा होती. लोकसभेत सभागृहाच्या एखादा सदस्य निवर्तला तर त्याला आदरांजली वाहण्याची प्रथा आहे. यात गैरही काही नाही. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते गोळवलकर गुरुजी यांच्या निधनानंतर सर्व संकेत बाजूला ठेवून लोकसभेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली होती आणि यात इंदिरा गांधी यांचा पुढाकार होता.

राजीव गांधी यांच्या निधनानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे आली होती. नेमक्या त्याच वर्षापासून युनोमध्ये आपापल्या देशाच्या मातृभाषेतून भाषण करण्याची प्रथा सुरू झाली. हिंदीतून भाषण करण्यास आपल्याला मर्यादा आहेत, हे नरसिंह राव जाणून होते. त्यामुळे त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदीतून भारताची बाजू मांडण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळी ही बातमी झाली होती.

राहुल गांधी तरुण आहेत. राजकारणात मोठा पल्ला गाठावा असे त्यांचे वयही आहे. त्यामुळे माणसे तोडण्यापेक्षा जोडण्यावर त्यांनी भर द्यायला हवा. त्यांच्या पक्षाला १३५ वर्षाची परंपरा आहे. या पक्षाची अशी एक व्होट बँकही आहे. काँग्रेसलाच निष्ठेने मतदान करायचे अशा अनेक पिढय़ा एकेका घरात आहेत. एवढे मोठे राजकीय वैभव पाठीशी असताना आपला नेता कुणाचाही अपमान करीत सुटतो हे अनेक काँग्रेसजणानाही पटणार नाही. राहुल गांधी यांना याची जाणीव कधी होणार?