X Close
X
9819022904

वाचवू इंधन, करू पर्यावरण रक्षण!


Mumbai:

सुबोध रणशेवरे

मागील दोन दशकांपासून ‘इंधन बचत ही काळाची गरज आहे’, ही घोषणा सातत्याने सर्व माध्यमांतून प्रसारित होताना दिसतेय. कारण जागतिक स्तरावर जर आपण मानवाला लाभलेल्या या इंधनरूपी नैसर्गिक वरदानाचा विचार केला, तर इंधन बचत करणं, ही खरोखरच किती मोठय़ा प्रमाणावर काळाची गरज आहे याचे गांभीर्य कळते.

पेट्रोल, डिझेल, केरोसीन किंवा अगदी सीएनजीसारखा नैसर्गिक वायू असेल, याच इंधनाचे नैसर्गिक स्रेत मानवाने शोधून काढल्यामुळेच वाहनांची निर्मिती होऊ शकली आणि अर्थात याच वाहनांमुळे दळणवळण यंत्रणा सुलभ आणि सुकर बनली हे सर्वज्ञात आहे; परंतु जगभरातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचा विचार केला, तर आपला भारत देश हा अशा प्रकारच्या वाहनांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या इंधनासाठी इतर मुबलक प्रमाणात इंधनाचा साठा असलेल्या इराण, इराकसारख्या देशांवर अवलंबून असलेला एक परावलंबी देश आहे. अर्थात, जागतिक आर्थिक बाजारपेठेनुसार, सातत्याने हे इंधनाचे दर देखील भरमसाट वाढत असतात. त्यामुळेच आपल्या भारतीय वाहन चालक किंवा मालकांना याच वाढत्या इंधनाचा आर्थिक भार सोसावा लागतो. इराण आणि इराकसारख्या देशांमध्ये नैसर्गिक स्रेत असलेले इंधनाचे साठे जरी सध्या मुबलक प्रमाणात असले आणि याच देशांकडून जगभरातील अन्य देशांना आवश्यक असलेल्या इंधनाचा पुरवठा होत असला तरी निसर्गाचे हे स्रेत कधी ना कधी संपुष्टात येणारच आहेत नव्हे हे स्रेत आता आटू लागलेले आहेत. म्हणूनच आता उपलब्ध असलेल्या इंधनाची अत्यंत गांभीर्याने बचत करणं, ही काळाची आणि मानवी जगण्याची देखील गरज बनलेली आहे.

अलीकडच्या काही दशकांचा विचार केला, तर जागतिक स्तरावर अर्थकारण हे सहज आणि सोपं बनत गेल्याने अगदी मध्यमवर्गीय माणसाकडे देखील पैशाची आवक वाढू लागली आणि म्हणूनच मग अगदी दुचाकींपासून चारचाकी उंची गाडय़ांची रस्त्यावर जणू स्पर्धाच सुरू झाली. वाहनांच्या किमती देखील अगदी लाखांच्या घरात आल्याने वाहन खरेदी करणं, ही अगदी सहजशक्य गोष्ट बनली; परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम तर होऊ लागलाच; परंतु याच वाहनांमधून बाहेर वातावरणात मोठय़ा प्रमाणात कार्बन डायऑक्साईडसारखा घातक वायू मोठय़ा प्रमाणात फेकला जाऊ लागला. ज्यामुळे पर्यावरण प्रदूषित होऊ लागले. वातावरणातील याच प्रदूषणामुळे हवा तापू लागली आणि जागतिक स्तरावर तापमान वाढीची समस्या ही गंभीर स्वरूप धारण करताना दिसतेय. या ग्लोबल वॉर्मिगचा अर्थात वाढत्या तापमान वाढीचे मानवी आरोग्यावर भयंकर असे दुष्परिणाम देखील वाढताना दिसतात. म्हणूनच भविष्यकाळातील मानवाचे पृथ्वीतलावरील अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, त्यासाठीच पर्यावरण रक्षण करायचे असेल, तर इंधन बचतीसाठी प्रत्येकाने काही नियम आणि बंधन सक्तीने पाळणं, ही काळाची गरज आहे. अगदी आवश्यकता असेल तरच खासगी वाहनांचा वापर सोडला तर नेहमी प्रवासासाठी केवळ सार्वजनिक प्रवासी वाहनांचा म्हणजे बस, एसटी किंवा रेल्वेचा वापर करावा.

आपल्या प्रत्येकाच्या या एका कृतीमुळे देशाचे किती तरी मोठय़ा प्रमाणात इंधन वाचू शकते. शिवाय केवळ आवश्यकता असेल तेव्हाच गाडीचा हॉर्न वाजवून नाहक होणारे ध्वनिप्रदूषण देखील आपण आपल्या प्रयत्नांतून कमी करू शकतो. मुळात बदलत्या काळाची गरज म्हणून सीएनजी प्रमाणित वाहनाचा वापर केला, तर कार्बन डायऑक्साईडसारखा पर्यावरणास घातक वायू बाहेर फेकला जाणार नाही आणि हवा प्रदूषित देखील होणार नाही. श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत प्रत्येकाला कमी अंतराच्या प्रवासासाठी सायकलसारखे दोन चाकी वाहन वापरून इंधनाची बचत करून स्वत:च्या आरोग्य देखील सहज जपता येईल.

घरगुती स्वरूपातदेखील अगदी एलपीजी गॅस वापरताना अन्न शिजविण्यासाठी कुकरचा वापर करणे, गॅस स्टोव्हची ज्योत शक्यतो मंद ठेवणे, स्वयंपाक करताना गॅस चुलीवर अन्न शिजवताना अतिरिक्त वेळ न घालविणे, असे अनेक उपाय योजून आपण इंधनाची बचत करू शकतो. खरे तर आता नैसर्गिक इंधनाचे साठे संपुष्टात येऊ लागल्यामुळेच काळाची गरज म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर देखील आता सक्तीचा होऊ लागला आहे. यापुढे तर नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या सौर ऊर्जेचादेखील वापर वाहनासाठी करावा लागणार आहेच. इंधन बचतीचा हाच मूलमंत्र समाजामध्ये खोलवर रुजविण्यासाठी आणि याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनसारख्या कंपनीच्या वतीने देखील सातत्याने सक्षमसारखा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमांतूनच अगदी शालेय स्तरापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वासाठी इंधन बचतीचे धडे दिले जात आहेत.

एकूण काय, तर नैसर्गिक इंधनाची बचत प्रत्येकाने आपापल्या परीने करणे आणि या बचतीतूनच पैसा आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, हीच काळाची गरज आहे .

मोबाईल : ९८३३१४६३५६
ई-मेल : subodh.ranshevre@rediffmail.com