X Close
X
9819022904

वसई-विरार महापालिकेत १२२ कोटींचा अपहार, २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


vasai-virar-mahapalika

वसई : शासनाचा कर चोरी करून सुमारे १२२ कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या २५ ठेकेदारांविरुद्ध विरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे वसई-विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या तक्रारीनुसार पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेच्या ठेकेदारावर अशा प्रकारे प्रथमच गुन्हे दाखल झाल्यामुळे आणि यातील काही ठेकेदारांचे सत्ताधारी पदाधिका-यांशी संबंध असल्यामुळे वसई-विरारमध्ये खळबळ माजली आहे.

जुलै २००९ या महापालिका स्थापनेपासून फेब्रुवारी २०१८ पर्यंत हे सर्व ठेकेदार महापालिकेत ठेका पद्धतीने कर्मचारी पुरवठा करण्याचे काम करत होते. एकूण ३१६५ पेक्षा जास्त ठेका कर्मचारी ज्यामध्ये वकील, अभियंते, डॉक्टर, आरोग्य व अग्निशमन कर्मचारी, संगणक चालक, लिपिक, मजूर, सुरक्षा रक्षक, मजूर, वाहन चालक, इ.चा समावेश आहे. प्रचंड आर्थिक पिळवणूक करून तसेच शासनाची मोठ्या प्रमाणात कर चोरी करून ठेकेदारांनी कोट्यवधींची लूट केली असल्याचे मनोज पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणांत, देयकासोबत आवश्यक कागदपत्रे तसेच वैधानिक तरतुदींची पूर्तता नसताना दरमहा लाखो रुपयाची देयके मंजूर करून रक्कम ठेकेदाराला अदा करणारे संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग व आशीर्वाद असल्यामुळेच ठेकेदारानी ठेका कर्मचा-यांना किमान वेतन, कर्मचारी भविष्य निधी, तसेच कामगार राज्य विमा अंशदानाच्या संरक्षण लाभापासून वंचित ठेवून बेठबिगारी पद्धतीने राबवून घेतल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या २५ ठेकेदारांनी शासनाचा सेवाकर व व्यवसाय कराचे सुमारे २९.५१ कोटी व कर्मचारी वेतनाचे ९२.९७ कोटी असे एकूण सुमारे रु. १२२.४८ कोटींचा अपहार केल्याचे दिसून येते. या संबंधी पुरावयासह केलेल्या लेखी तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आदेशाने विरार पोलीस ठाण्यामध्ये सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेले अनेक महिने सातत्याच्या पाठपुराव्यानंतर या ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले असून, ठेका कर्मचारी व शासन यांची फसवणूक करणारे ठेकेदार उघडे पडले आहेत. महापालिका अधिका-यांवरसुद्धा येत्या काळात गंडांतर येणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. – मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, वसई-विरार

(PRAHAAR)