X Close
X
9819022904

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मिळणार लाभ


health

पडवे-कसाल : एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार व शस्त्रक्रिया होणा-या रुग्णांना आता शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून पिवळे व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबियांना २२ हून अधिक रोगांवर मोफत औषधोपचार, फेरतपासणी, अंतररुग्ण उपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रुग्णालयाच्यावतीने रुग्णांना मोफत जेवण तसेच जाताना घरापर्यंत हॉस्पिटलच्या खर्चाने पोहोचविण्याची सोयही करण्यात आलेली आहे. या योजनेतून होणा-या मोफत उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ जिल्ह्यातील रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे संस्थापक माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा स्वतंत्र कक्ष आजपासून लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कार्यरत झाला आहे.

कॅथलॅबची सुविधा, एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी होणार मोफत

खा. नारायण राणे म्हणाले, लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सुरु करण्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यातील हृदयविकाराच्या रुग्णांवर याच हॉस्पिटलमध्ये एन्जीओग्राफी आणि एन्जीओप्लास्टी सर्जरी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात येणार आहे. या विकारांवरील शस्त्रक्रिया व उपचार करणारे तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील जनतेने घ्यावा, असेही खा. राणे म्हणाले.

मेंदू, मूत्र, कॅन्सर उपचार, शस्त्रक्रिया सुविधा केवळ लाईफटाईममध्येच..

खा. नारायण राणे म्हणाले, मेंदू विकार, मेंदूतील रक्तस्त्राव, मणके विकार, कॅन्सर रोगावरील शस्त्रक्रिया, मुत्रविकार (युरोसर्जरी), लहान मुलांच्या आजारावरील शस्त्रक्रिया (पेडियाट्रीक शस्त्रक्रिया), कान, नाक, घसा रोगांवरील शस्त्रक्रिया आदी उपचार व शस्त्रक्रिया सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्यत्र कुठच्याही सरकारी अगर खासगी रुग्णालयामध्ये उपलब्ध नाहीत. अशा प्रकारच्या सुविधा केवळ लाईफटाईम हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यामुळे या रोगांवरील उपचार व शस्त्रक्रिया राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत होणार आहेत. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही हॉस्पिटलचे संस्थापक, खा. नारायण राणे यांनी केले आहे.

जनआरोग्य सुविधेसाठी संपर्क महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी श्री. विजय साळवी (९०२१५७५३३९) आणि दुर्वा (९५४५७७१२४०) तसेच ०२३६७-२३४०००, २३४१०० यावर संपर्क साधावा असे आवाहनही हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डायलेसीस ही होणार मोफत

खा. नारायण राणे म्हणाले, लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये किडनी संबंधीच्या आजारांवरही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार आहेत. जिल्ह्यात नेप्रॉलॉजी तज्ज्ञ केवळ लाईफटाईममध्येच उपलब्ध आहेत. डॉ. प्रकाश घोगळे हे किडनी विकार तज्ज्ञ या हॉस्पिटलच्या सेवेत असून सुसज्ज असे डायलेसीस सेंटरही येथे सुरु करण्यात आलेले आहे. आज महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ८ किडनी रुग्णांना डायलेसीस उपचार सुविधा मोफत देण्यात आली. रुग्णालयाच्या डायलेसीस कक्षात ६ डायलेसीस मशिन उपलब्ध आहेत. त्याशिवाय आयसीयु विभागामध्येही एक डायलेसीस मशिन उपलब्ध आहे. त्यामुळे आयसीयुतील रुग्णाला तेथेच डायलेसीस उपचार देण्यात येतात. एका रुग्णाला आठवडय़ातून किमान दोन वेळा डायलेसीस उपचार द्यावे लागतात, त्यानुसार हॉस्पिटलच्या डायलेसीस सेंटरमध्ये महिन्याला ३० ते ३५ रुग्णांच्यावर डायलेसीस उपचार करण्याची सुविधा आहे. या सेंटरमध्ये तीन तंत्रज्ञ व दोन प्रशिक्षित परिचारीका रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध आहेत, असे नेप्रॉलॉजी तज्ज्ञ डॉ. प्रकाश घोगळे यांनी सांगितले.

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सामान्य शस्त्रक्रिया, डोळे व त्यासंबंधीचे आजार, कान, नाक, घसा रुग्णांवर उपचार, मोफत श्रवणयंत्रांचे वाटप, स्त्रीरोगावर उपचार, तसेच अस्थीरोग, आतडे व पाचनतंत्रासंबंधीचे आजार, बालरोग, मेंदू व मणक्यांच्या आजारांवर उपचार, भाजलेल्या रुग्णांवर उपचार, साथीचे रोग, क्षयरोग, छातीचे रोग, त्वचा रोग, संधिवात, दंत व तोंडासंबंधीचे आजार, रेडिओलॉजी आदी आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

(PRAHAAR)