X Close
X
9819022904

रोहित पवारांचा एक फोन जातो तेव्हा…


rohit-pawar

जामखेड : नशिबी कायम दुष्काळ, घरची आर्थिक परिस्थिती बेताची, अन शेती जिरायती अश्या परिस्थितीत जगणा-या शेतकरी कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला जर मोठा आजार उद्भवला अन त्यासाठी आर्थिक खर्चाचा डोंगर उभा राहिला तर मग त्या कुटूंबाची होणारी अवस्था अतिशय केविलवाणी होऊन जाते. आजार बरा करण्यासाठी लागणा-या खर्चाची रक्कम जमवण्यासाठी मग सुरू होते धावाधाव. यात यश मिळेलच असं काही नसतं. यश आलं तर आजारी रूग्णाला योग्य उपचार मिळतो नाहीतर मग मरण ठरलेलंच असतं. अश्यातच जर ना नात्याचा ना गोत्याचा ना ओळखीचा तरीही एखादा माणुस एका फोनवर मदतीचे चक्रे फिरवून मदतीला धावून जातो तेव्हा गरजूला अकाश ठेंगणे होऊन जाते. मग माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास अडचणीतल्या कुटूंबाला मिळतो. जामखेड तालुक्यातील एका शेतकरी कुटूंबाला असाच विश्वास दिलाय राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी.

जामखेड तालुक्यातील शेवटचं गाव म्हणजे दिघोळ. दिघोळ तसं मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेलं बालाघाट डोंगररांगेतील गाव. याच गावातील शितल संतोष मोटे ( वय २९) यांचं कुटूंब वास्तव्यास आहे. मोटे कुटूंबाकडे जेमतेम कोरडवाहू शेती आहे. शेती आणि मोलमजुरी यावरच या कुटूंबाची गुजराण आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या मोटे कुटूंबातील शितल मोटे या मागील तीन चार वर्षांपासुन सतत सर्दी-खोकल्याचा त्रासाने आजारी पडत होते. शितल यांच्यावर स्थानिक दवाखान्यांमध्ये उपचार करण्यात आले. परंतु त्यांचं सतत आजारी पडणे सुरूच असायचे. आसपासच्या सर्व दवाखाने पालथे घालूनही आजारपण कायम होतं.

दरम्यान सतत आजारी पडत असलेल्या शितल यांना काही दिवसांपूर्वी बार्शी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉ. हिरेमठ हॉस्पीटलमध्ये शितल यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यातील २-डी इको तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयाच्या झडपेसंदर्भातील आजार असल्याचे निदान झाले. हृदयाच्या झडपेचे ऑपरेशन(बीएमव्ही) करण्यासाठी हिरेमठ हॉस्पीटलकडून पेशंटला पुणे येथे घेऊन जाण्यास सांगण्यात आले होते. या ऑपरेशनसाठी दीड ते दोन लाखांचा खर्च येणार होता.

दरम्यान घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या मोटे कुटूंबासमोर ऑपरेशनचा खर्च कसा करायचा याचे मोठे संकट उभे राहिले. ऑपरेशनच्या खर्चाची आर्थिक तजवीज करण्यासाठी मोटे कुटूंबाकडे पैश्यांची जुळवाजुळव करण्याशिवाय पर्यायच नव्हता. परंतु यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक जुळवाजुळव कशी करायची हा मोठा प्रश्न उभा ठाकला होता. अश्यातच शितल मोटे यांचे बंधू हनुमंत कोचाळे यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहितदादा पवार यांच्या बारामती येथील संपर्क कार्यालयाकडे संपर्क साधत बहिणीच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची साद घातली होती.

जामखेड तालुक्यातील एका गरिब कुटूंबातील महिला रूग्णाचे हृदयाचे ऑपरेशन असुन त्यासाठी दीड ते दोन लाखाचा खर्च येणार आहे त्याकरिता आर्थिक मदतीसाठी आपल्या कार्यालयाकडे मागणी नोंदवण्यात आली असल्याची माहिती रोहित पवार यांचे सहकारी व टीमने रोहित पवारांच्या कानावर घातली. पवार यांनी वस्तुस्थिती जाणून घेत कोचाळे यांच्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. शितल मोटे कुठल्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत याची माहिती घेतली व शितल मोटे याना देवयानी हॉस्पीटलमध्ये दाखल होण्यास सांगितले व रोहित पवारांनी थेट देवयानी हॉस्पीटलमध्ये फोन लावला अन शितल मोटे या महिला रूग्णाच्या हृदयाच्या ऑपरेशनचा मार्ग मोकळा झाला. अवघ्या आठ दिवसांमध्ये शितल मोटे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशनसाठी लागणारया दीड लाखासह इतर सर्व खर्चाचा प्रश्न युवा नेते रोहित पवारांनी चुटकीसरशी एका फोनवर सोडवला व नाममात्र खर्चात ऑपरेशन झाले.

दुष्काळाने होरपळणार्या जामखेड तालुक्यातील गरजू रूग्णासाठी युवा नेते रोहित पवारांनी सामाजिक बांधिलकी जपत दिलेल्या मदतीच्या हातामुळे गरिब कुटूंबातील माऊली आजारातुन बरी होऊ शकली. रोहित पवारांनी दाखवलेल्या मानवतेच्या सामाजिक दायित्वाचे जामखेड तालुक्यातुन कौतूक केले जात आहे.

(PRAHAAR)