X Close
X
9819022904

यंदाची ट्रिप कुठे? झिम्मा 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


Mumbai:

मुंबई : बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करणारा झिम्माचा सीक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. युट्युबवर झिम्मा 2 चा ट्रेलर रिलिज झाला असून हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे.

हेमंत पोस्टमध्ये लिहितो- “पुढच्या ट्रिपची तयारी सुरू… पुन्हा खेळूया आनंदाचा खेळ..! ‘झिम्मा 2’… तुमच्या भेटीला दसऱ्याच्या मुहूर्तावर!”. हेमंतच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

या ट्रेलरमध्ये निर्मलाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा त्यांच्या साहेबांकडे म्हणजेच अभिनेते अनंत जोग यांच्याकडे फिरायला जाण्यासाठी परवानगी मागतात. साहेबही त्यांच्यासोबत ट्रीपला यायला तयार होतात. मात्र निर्मला त्यांना नकार देते. पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं त्यांना सांगते. पण यात एक ट्वीस्ट आहे. आता निर्मला आणि साहेबांच्या मुलाचं लग्न झालं आहे. घरात सून आली आहे. त्यामुळे सूनबाईंना सोबत घेऊन जा, असं ते निर्मलाला सांगतात.

या सूनबाई नेमक्या कोण आहेत? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार? त्यात कोण कोण असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच याची उत्तर प्रेक्षकांना मिळतील हे नक्की.

अनेक महिलांनी केली ‘झिम्मा 2’ ची मागणी

‘झिम्मा 2’ बद्दल हेमंत ढोमे म्हणाला,” झिम्मा चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर गृहिणींनी, तरुणींनी स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला. हा सिनेमा प्रत्येक महिलेला खूप जवळचा वाटला. अनेक महिलांनी ‘झिम्मा 2’ ची मागणी केली होती. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा 2’चा निर्णय घेतला आहे.