X Close
X
9819022904

मोबाईल व्हॅन रोखणार दुधातील भेसळ!


Mumbai:

पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांची माहिती

मुंबई : दुधातील भेसळ रोखण्यासाठी दुधाची जागेवर तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर केला जाणार आहे. यामुळे दुधाच्या दर्जाबाबत खात्री करणे शक्य होईल आणि भेसळ करणा-यांवर जरब बसेल, असे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

दुग्ध व्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभागांद्वारे दूध भेसळ रोखण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केदार बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आयुक्त डॉ. पल्लवी दराडे हेही उपस्थित होते.

दुधातील भेसळ तपासण्यासाठी वापरल्या जाणा-या मोबाईल व्हॅन अद्ययावत आहेत. दुधाच्या नमुन्यांची तपासणी करणे, जनजागृती करणे, महत्त्वाचे संदेश देणे, प्रात्यक्षिके अशा विविध प्रकारच्या १० सुविधा या व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत. दुग्ध विकास विभागातील कार्यरत रसायनशास्त्रज्ञां(केमिस्ट)मार्फत दुधाची तपासणी केली जाणार आहे.

यासाठी रसायनशास्त्रज्ञांना आवश्यक प्रशिक्षणही अन्न व औषध विभागामार्फत देण्यात येणार आहे, अशी माहिती केदार यांनी दिली. अहमदनगर आणि पुणे या भागात दूध संकलन मोठय़ा प्रमाणात होते. या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश केदार यांनी संबंधित अधिका-यांना दिले.