X Close
X
9819022904

मेट्रोसाठी पुन्हा ५०८ झाडांचा बळी?


Mumbai:

शिवसेनेच्या भूमिकेकडे मुंबईकरांचे लक्ष

मुंबई : मुंबईत मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील २२०० झाडे तोडल्याने त्याला विरोध असल्याचा आव आणला होता. आता पुन्हा मेट्रो स्टेशन आणि मार्गात येणारी तब्बल ५०८ झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. ही झाडे तोडण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेते, याकडे वृक्षप्रेमी आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या काळात आरे येथील मेट्रो कारशेडसाठी झाडे कापण्यावरून जोरदार वाद रंगला होता. त्यावेळी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि वृक्षप्रेमी संस्था आक्रमक झाल्या होत्या. काही संस्थांनी निदर्शनेही केली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आरे वसाहतीमधील झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा मेट्रो प्रकल्पासाठी ५०८ झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. यात १६२ झाडे मुळापासून कापली जाणार आहेत. तर ३४६ झाडे पुनरेपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत.

मेट्रो कारशेडसाठी २२०० झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी शिवसेनेने विरोध केला होता. त्यावेळी वृक्ष प्राधिकरण समितीमधील इतर सदस्यांनी वृक्ष तोडीच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यामुळे २२०० झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली होती.

आता पुन्हा मेट्रोसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सादर करण्यात आला आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही नेहमीच पर्यावरणाच्या बाजूने असून झाडे तोडली जाऊ नयेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

अशी कापावी लागणार झाडे

>> अंधेरी डी. एन. नगर ते ओशिवरा नाला मेट्रो २ साठी ३२ झाडे कापावी लागणार, तर ९० झाडे पुनरेपित करावी लागणार आहेत.

>> गोरेगाव आणि बांगूरनगर मार्गात स्टेशनच्या बांधकामात आडवी येणारी २९ झाडे कापावी लागणार, तर ८५ झाडे पुनरेपीत करावी लागणार.

>> कांदिवली पश्चिम भागातील लालजीपाडा ते महावीरनगर दरम्यान ५३ झाडे कापावी लागणार आणि २१ झाडे पुनरेपीत केली जाणार.

>> दहिसर पूर्व ते डी. एन. नगर दरम्यानची ६४ झाडे कापणे आणि ३७ झाडे पुनरेपीत करण्यात येणार आहेत.

>> लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो ११ झाडे कापावी लागणार आणि ८६ झाडे पुनरेपीत करावी लागणार आहेत.