X Close
X
9819022904

मुंबई, पुणे सायबर गुन्हेगारांच्या रडारवर


Mumbai:

मुंबई : मुंबई, पुण्यासह नवी दिल्ली, बंगलोर, कोलकाता या शहरांवर सायबर गुन्हेगारांची नजर असून महाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना सर्वात जास्त टार्गेट करण्यात आल्याचे क्विक हील टेक्नॉलॉजीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वार्षिक इशारा अहवालामाध्ये निष्पन्न झाले आहे.

क्विक हील सिक्युरिटी लॅब्सने २०१९ वर्षभरात सायबर धोक्याच्या संदर्भात जमवलेल्या माहितीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला असून भारतीय ग्राहक हे सायबर गुन्हेगारांचे सर्वात मोठे टार्गेट असल्याची चिंताजनक बाब दिसून आली आहे.

महाराष्ट्रात तब्बल ३८ दशलक्ष धोके ओळखले गेले असून यातील २५ दशलक्ष केवळ मुंबई, पुण्यातील आहेत. महाराष्ट्राखालोखाल दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गुजरात ही राज्येदेखील सायबर धोक्याच्या कक्षेत असल्याचे सिद्ध झाले आहे. २०१९ वर्षभरात क्विक हीलने १ बिलियनपेक्षा जास्त माहिती असलेल्या तसेच नसलेल्या धोक्यांना रोखण्यात यश मिळवले आहे.

सायबर गुन्हेगार अधिक जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक किचकट पद्धतीने गुन्हे करू लागले आहेत, त्यामुळे सायबर गुन्हे ओळखले किंवा पकडले जाणे तितकेसे सोपे उरलेले नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. खासगी माहिती विकून पैसे कमावण्यासाठी असुरक्षित डिजिटल डिव्हायसेस हॅक करण्यासाठी सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रांचा वापर करत आहेत. ही सर्व माहिती अशा ठिकाणी विकली जाते जिथून त्याचा वापर करून समाजाला धोकादायक अशी कारस्थाने केली जातात. जागरूकतेचा अभाव, असुरक्षितता आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम्स यामुळे ग्राहक त्यांना सहजपणे बळी पडतात ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे, असे क्विक हील टेक्नॉलॉजीजचे सीटीओ आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी म्हटले आहे.

सायबर संरक्षणाकरिता जनजागृती आवश्यक: रितेश भाटिया
मुंबई: इंटरनेटचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. सायबर क्राईम हे अधिक अत्याधुनिक होत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांनी सायबर-निरक्षर राहून चालणार नाही. सायबर संरक्षणाकरिता जनजागृती हे सर्वोत्तम साधन असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट आणि सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन्सचे संस्थापक संचालक रितेश भाटिया यांनी केले.

सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने मुंबईतील न्यू एक्सेलसियर मुक्ता ए२ सिनेमाज येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी निराली भाटिया यांनी सायबर जगाच्या वेगवान विस्ताराबरोबरच अदृश्य धोके आणि सायबर गुन्हे देखील वाढत असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आणले. आजच्या सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये उदासीनता, झपाटलेपण (अब्सेशन), स्वाभिमानाचा अभाव आणि व्यसन सर्वसामान्यपणे आढळून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.