X Close
X
9819022904

मुंबईत पाणीटंचाईचे संकट तूर्तास टळले!


01BGH_WATER_1772458f

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत बरसणाऱ्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत सातही धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात तब्बल १ लाख १६ हजार ५५९ दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. त्यामुळे २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांत एकूण ५ लाख ३१ हजार ७३४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार सध्याचा पाणीसाठा पाहता मुंबईला पुढील ११५ दिवस म्हणजे ३१ ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे लवकरच पाणीसाठ्यात वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे तलावातील पाणीसाठा कमी होत होता. परिणामी पालिका व मुंबईकरांना पाण्याबाबत चिंता सतावत होती.

जर गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पडून पाणीसाठ्यात वाढ झाली नसती, तर मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार होते. मात्र आता तलावात पावसाची संततधार सुरु असून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाणी कपातीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

(PRAHAAR)