X Close
X
9819022904

मुंबईत आजही लसीकरण बंद


Mumbai:

मुंबई (प्रतिनिधी) : लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने बुधवारपाठोपाठ उद्या गुरुवारीही लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे; परंतु कोविशिल्ड व कोवॅकि्सनचे ६१ हजार डोस उपलब्ध झाल्याने शुक्रवार २३ जुलैपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.

शुक्रवारी मुंबईतील शासकीय व पालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोविशिल्डचे ५० हजार, तर कोवॅक्सिनचे ११ हजार २०० असे एकूण ६१ हजार २०० डोस उपलब्ध होणार आहेत. बुधवारी रात्री उशिराने लस मुंबईत दाखल होणार असून गुरुवारी दिवसभर लसीकरण केंद्रांवर वितरित केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारीही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

मुंबईत पालिकेची केंद्रे, राज्य सरकारची केंद्रे यांच्यामार्फत मोफत लसीकरण करण्यात येत आहे. मात्र गुरुवारी लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने बुधवारपाठोपाठ गुरुवारीही मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोविशिल्ड व कोवॅकि्सनचे ६१ हजार डोस उपलब्ध झाल्याने गुरुवारी त्यांचे वितरण करून शुक्रवार २३ जुलैपासून पुन्हा लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.