X Close
X
9819022904

मुंबईकरांनो, काळजी घ्या! पावसाचा जोर वाढला; तीन दिवस धोक्याचे


Mumbai:

मुंबई (प्रतिनिधी) : पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.

सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबईत धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत अखंडपणे पाऊस कोसळत असून शनिवारपासून जोर वाढला आहे. लोकल सेवेसह रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम होत असून, बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबई शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत मंगळवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री ८.३० वाजेपर्यंत राम मंदिर येथे ७८ मिमी असा २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.१ आणि किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मुंबई, मुंबई उपनगरं, ठाणे, नवी मुंबईत बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळपासून पावसाची संततधार कायम असून, महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला.

सकाळी १० वाजेनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे रस्त्यावर धुके पसरल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. पावसाची संततधार कायम असल्यानं मुंबईतील सायनसह अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम प्रवासी रेल्वेवर झालेला नाही.

जव्हारमध्ये पूर

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात १५ जुलैनंतर सुरू झालेल्या पावसाने वेग घेतला असून शेतकऱ्यांचे त्यामुळे समाधान झाले आहे. २१ जुलै रोजी ३५० मिमी पावसाची नोंद जव्हारमध्ये झाली असून रात्री उशिरापासून सुरू झालेल्या पावसाने जव्हार शहरात इतिहासात प्रथमच पूरपरिस्थिती निर्माण केली होती. वाडा तालुक्यात भाताची लागवड पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसाने विक्रमगड तालुक्यात विक्रमी १३० मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसाने तालुक्यातील सर्व नद्या-नाल्यांना महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे नालासोपारा पूर्वेला पावसाचे पाणी घरात शिरल्याने सहा घरे कोसळली आहेत.