X Close
X
9819022904

मातृभाषेतूनच शिक्षण घेणे फायद्याचे!


Mumbai:

शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ करताना गेल्या काही वर्षात ‘प्रवेशाची समस्या’ एव्हरेस्टचे टोक गाठू लागली आहेत. शाळेची निवड अग्निपरीक्षा ठरत आहे. नजीकच्या काळात त्यात आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे ‘माध्यमाची निवड’. कुटुंबात त्यावर आता चर्चा न होता वादविवाद घडू लागले आहेत. आईचे एक मत, तर वडिलांचे दुसरे. कधी दोघांचे एकमत पण आप्तस्वकीयांचा वेगळा सल्ला. कधी-कधी सर्वाचे एकमत पण शेजा-याच्या मुलाशी तुलना व त्यातून उडणारा गोंधळ. माध्यमाची निवड करताना कुठलेच तर्कशास्त्र वापरले जात नसल्यामुळे मध्यमवर्ग व कनिष्ठ वर्गाचा गोंधळ उडतो आहे. अन्य वर्गीयांचे अंधानुकरण करण्याचा कल योग्यच ठरेल असे नाही. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’. साधन महत्त्वाचे नसून साध्य महत्त्वाचे असते. दुर्दैवाने साधनालाच साध्य मानण्याच्या गैरसमजामुळे ‘इंग्रजी माध्यमाचे अंधानुकरण’ होताना दिसते आहे.

महानगरातून हे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. अर्थातच त्याचा योग्य वापर, विनियोग झाल्यास आनंदच. इंग्रजी भाषेच्या तुष्टीकरणाचा हेतू इथे नसून, माध्यम म्हणून सारासार विचार न करता इंग्रजीचा अवलंब करण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा आहे, हे लक्षात घ्यावे. शिक्षणाचे माध्यम म्हणून अमूक एका भाषेची निवड करण्यामागचे प्रयोजन काय, हा प्रश्न अनेकांना निरुत्तर करतो. लकडे समर्थन-सबब, केले जाते. कारण मुळातच इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीची शिक्षणाचे माध्यम म्हणून निवड करणे यामध्ये संभ्रम झालेला असतो. इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी भाषेतून संपूर्ण शिक्षण घेण्याची खरेच आवश्यकता आहे का? किंवा इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यावरच इंग्रजी येते असे आहे का? आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते येतेच असे आहे का? याचा सारासार विचार व्हायला हवा.

मातृभाषेतून शिक्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे. मूल जन्माला आल्यानंतर भाषा शिकते, तेही शाळेत न जाता असे कुठे घडले आहे का? मूल शाळेत गेल्यावरच बोलू लागले. नाही का? कुठलीही भाषा समाजात, कुटुंबात वावरताना होणा-या संभाषणातून शिकली जाते. सतत कानावर पडणा-या शब्दांमुळे शब्दसंपत्ती वाढत जाते. त्यामुळेच शहरामध्ये मुले आपल्या भाषेव्यतिरिक्त अन्य भाषा सहजपणे (उदा. हिंदी) बोलू लागतात. सांगायचा मुद्दा हा की भाषा फक्त पुस्तकातून शिकली जाऊ शकत नाही, त्यासाठी कौटुंबीक-सामाजिक पूरक वातावरण गरजेचे असते. आपली विचार प्रक्रिया मातृभाषेतून चालू असते. त्यामुळेच मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हृदयापर्यंत पोहोचते, तर अन्य भाषेतील फक्त मेंदूच्या पातळीवरच राहते. मराठी मातृभाषा असणा-या मुलांना इंग्रजी (किंवा अन्य कोणत्याही) माध्यमातून दिले जाणारे शिक्षण आकलनाच्या पातळीवर जड पडते. कारण प्रथम येणारे ज्ञान हे मेंदूला मातृभाषेत रूपांतरित करावे लागते व नंतर ग्रहण केले जाते. हा प्रकार म्हणजे सरळ न जेवता कानामागून हात घेऊन जेवण्यासारखा होय. आजचे युग संगणकाचे आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे काळाची गरज आहे. शंभर टक्के मान्य. परंतु त्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीतून घेण्याचा घाट घालणे कितपत व्यवहार्य ठरते, हा खरा कळीचा प्रश्न आहे.

इंग्रजी भाषेचे ज्ञान असण्यासाठी सर्रासपणे माध्यम म्हणून इंग्रजीची निवड करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार ठरतो. इंग्रजीतून शिक्षण म्हणजेच करिअरची उत्तम संधी, केंद्रीय बोर्डाचा दर्जा हा राज्य बोर्डापेक्षा अधिक, इंग्रजी शाळांचे चकचकीत बाह्यरूप, अधिक शुल्क (महागडे ते उत्तम या धारणेतून येणारे स्टेटस सिम्बॉल), ज्यांना परवडत नाही तेच फक्त मराठी शाळेत प्रवेश घेतात, आपल्याला जे मिळालेले नाही ते आपल्या पाल्यासाठी एनकेन प्रकारे देण्याची ऊर्मी, इंग्रजीतून बोलणारे म्हणजे हुशार. इंग्रजी म्हणजे यशाचा राजमार्ग. मातृभाषेविषयी न्यूनगंड यासारखे अनेक गैरसमज इंग्रजी माध्यमाच्या अंधानुकरणास कारणीभूत आहेत. भविष्यातील उच्चशिक्षणाच्या सुलभीकरणासाठी प्राथमिक स्तरापासून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार सयुक्तिक वाटत नाही कारण फक्त १०-१२ टक्के मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. धुणी-भांडी करणारी माता किंवा रिक्षाचालक पिता काहीही होऊ दे, मला इंग्रजी शाळेतच पाल्याला शिकवायचे आहे ही भीष्मप्रतिज्ञा करताना दिसतो. यावरून इंग्रजीचे गारूड किती भिनले आहे याची प्रचिती येते. या धारणेमुळे अनेक पालकांची आर्थिक ससेहोलपट (अगदी उच्च मध्यमवर्गालादेखील आता शुल्क भारी पडू लागले आहे.) तर विद्यार्थ्यांची बौद्धिक ससेहोलपट होते आहे.

दृष्टिक्षेपातील उपाय : १ मराठी माध्यमातून शिकूनही चांगले इंग्रजी येऊ शकते हा विश्वास येण्यासाठी पहिलीपासून शिकवणारा शिक्षक हा इंग्रजीचाच पदवीधर असावा. राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम केंद्रीय मंडळाशी समकक्ष असावा (९वी-१० वीला तो होतो आहे.) इंग्रजी शिकणे आणि इंग्रजी माध्यमातून शिकणे याविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जनजागृती व्हायला हवी. संगणकाशी जोडणारे तंत्रज्ञान (सॉफ्टवेअर्स) मराठी भाषेत उपलब्ध व्हायला हवीत. मराठी माध्यमाच्या सर्व संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचा-यांना मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकणे बंधनकारक करावे. स्वत:ला झळ बसल्यास आपसूकच दर्जा सुधारेल. व्यावहारिक उपयोजिता हा कुठल्याही भाषेवरील प्रेमाचा प्रमुख निकष असतो.

यामुळे मराठीची उपयोजिता वाढवण्यासाठी तातडीचे उपाय योजावेत. बहुतांश पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग इंग्रजी माध्यमाचे आहेत. त्याचा परिणाम टाळण्यासाठी मराठीत दर्जेदार बालवाडय़ा उपलब्ध व्हाव्यात. समान संधीच्या अधिकाराचे जतन करण्यासाठी मराठी माध्यमाला सम बाजारमूल्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शैक्षणिक माध्यम भेद हा सामाजिक आणि आर्थिक विषमतेला खतपाणी घालणारा आहे, याचे निराकरण व्हायला हवे. इंग्रजी भाषेचा न्यूनगंड आणि भय दूर करण्यासाठी इंग्रजीस पूरक कार्यक्रम मराठी माध्यमाच्या शाळेत राबवावेत. जवळपास सर्वच मराठी शाळा अनुदानित आहेत, तरीही याकडे ओढा कमी का? यावर सखोल चिंतन व्हायला हवे. केवळ दुस-याकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याची वृत्ती घातक ठरते आहे.