X Close
X
9819022904

भारताला संघ चाचपण्याची संधी


Mumbai:

न्यूझीलंड अध्यक्षीय संघाविरुद्धचा एकमेव सराव सामना

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना शुक्रवारपासून (१४ फेब्रुवारी) हॅमिल्टनमध्ये खेळला जाणार आहे. या लढतीद्वारे पाहुण्यांना आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी क्रिकेटपटू चाचपून पाहण्याची संधी आहे.

टी-ट्वेन्टी मालिकेतील निर्भेळ यशानंतर वनडे मालिकेत ०-३ असा दारुण पराभव झाल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ जमिनीवर आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये सुरुवात होत आहे. दुसरा आणि अंतिम सामना २९ फेब्रुवारीपासून ख्राइस्ट चर्चमध्ये खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये सुरुवात होत आहे. दुसरा आणि अंतिम सामना २९ फेब्रुवारीपासून ख्राइर्स्टचर्चमध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेत खेळ उंचावून पाहुणा संघ वनडेतील अपयश पुसून काढण्यास उत्सुक आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा संघ १२० रेटिंग गुणांसह अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंड (१०५ गुण) चौथ्या स्थानी आहे. आयसीसी क्रमवारी आणि कसोटीतील फॉर्म पाहता पाहुण्यांचे पारडे जड आहे. घरच्या पाठिराख्यांसमोर यजमानांना गृहीत धरून चालणार नाही. वनडे मालिकेत भारताला त्याचा पुरेपूर प्रत्यय आला. कसोटी मालिकेतील संघबांधणीबाबत पाहुण्यांना सराव सामन्यात काही प्रयोग करता येतील. त्यात पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांच्यापैकी एकाला संधी देण्यावरून मतभेद आहेत.

कसोटी मालिकेत मयांक अगरवाल आणि रोहित शर्माने डावाची सुरुवात केली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध रोहित नाही. त्यामुळे मयांकसह डावाची सुरुवात करून घेण्यासाठी पृथ्वी आणि शुबमनमध्ये स्पर्धा आहे. गिलने अद्याप कसोटी पदार्पण केले नसले तरी भारत ‘अ’तर्फे न्यूझीलंडमध्ये खेळताना दोन सामन्यांत त्याने एका द्विशतकासह दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

भारतासमोर वेगवान मा-याच्या ‘कॉम्बिनेशन’चे आव्हान आहे. पायाचा घोटा दुखावल्यामुळे इशांत शर्मा बंगळूरुत उपचार घेत आहे. त्याच्या तंदुरुस्ती चाचणीवर त्याचा मालिकेतील सहभाग अवलंबून राहील. एकमेव सराव सामन्यातही तो खेळू शकणार नाही. भरवशाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा झटपट मालिकेत खेळला तरी गेल्या वर्षी ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौ-यानंतर तो प्रथमच कसोटी सामना खेळत आहे. टी-ट्वेन्टी मालिकेत चमकदार गोलंदाजी केली तरी वनडे मालिकेत तो निष्प्रभ ठरला. त्याच्यासह उमेश यादव आणि मोहम्मद शमीवर वेगवान गोलंदाजीची भिस्त आहे. फिरकीपटू म्हणून अंतिम संघात निवडीसाठी लेगस्पिनर ऑफस्पिनर आर. अश्विनमध्ये चुरस आहे. मात्र अश्विनचा समावेश नक्की वाटतो. त्यामुळे सराव सामन्यात त्यालाच संधी मिळेल.

‘ब्ल्यू स्प्रिंग’ची सफर
कसोटी मालिकेपूर्वी मिळालेल्या विश्रांतीदरम्यान भारताच्या क्रिकेटपटूंनी गुरुवारी न्यूझीलंडमधील प्रसिद्ध ‘ब्ल्यू स्प्रिंग’ची सफर केली. किवींच्या देशातील पुटॅरूरू हे नितळ आणि स्वच्छ पाण्यासाठीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. पाहुण्या क्रिकेटपटूंनी निळय़ाशार पाण्याचा आनंद लुटताना काही तास मौजमजा केली. त्याचे फोटो बीसीसीआयने त्यांच्या ‘ट्विटर हँडल’वरून ‘पोस्ट’ केलेत. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारासह यष्टिरक्षक वृद्धिमान साहा, ऑफस्पिनर आर. अश्विन, वेगवान गोलंदाज उमेश यादवसह जसप्रीत बुमरा आणि राखीव यष्टिरक्षक रिषभ पंतसह पृथ्वी शॉ आणि शुबमन गिलने ‘ब्ल्यू स्प्रिंग’ परिसराचा आनंद घेतला.