X Close
X
9819022904

पुराने घर गेले अन् पितृछत्रही हरपले


pitru-chatra

कोल्हापूर : कदमवाडीत राहणा-या रोहिणी कोकाटे हिचा विवाह ठरल्यापासून त्यांच्या दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात आनंदाचा पूर आला होता. ऑगस्टच्या ११ तारखेला रोहिणी आणि बार्शी येथील वीर चंदनशिवे यांचा विवाह होणार होता. पण, ६ ऑगस्टला महापुराचे पाणी घरात घुसल्याने कोकाटे कुटुंबाला स्थलांतरीत व्हावे लागले. दोन दिवसांनी घराची स्थिती पाहण्यासाठी गेलेल्या रोहिणीच्या वडिलांना पाण्यात बुडलेल्या घराची अवस्था पाहून हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. महापुराने रोहिणीच्या डोक्यावरील छतही गेले आणि विवाहाच्या चार दिवस आधीच पितृछत्रही हरपले. आता घरही नाही आणि वडीलही नाहीत, असा दु:खाचा डोंगर रोहिणीसह चारही भावंडांवर कोसळला आहे.

आनंदाचा पूर ओसरून दु:खाच्या पुरात कोकोटे कुटुंबीय पडक्या घराला सावरत आहेत. कदमवाडी परिसरातील साळोखे मळा भागात दोन खोल्यांच्या साध्या घरात मुकुंद कोकाटे पत्नी, दोन मुली, मुलगा व पत्नी यांच्यासोबत राहतात. एका मुलीचा विवाह झाला असून, रोहिणीचा विवाह निश्चित झाला होता. सेंट्रिंग काम करणा-या मुकुंद यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. त्यातून बचत करून रोहिणीच्या विवाहाची तयारी त्यांनी केली होती. दागिने, आहेराचे कपडे, रुखवताच्या वस्तूंनी घर भरून गेले होते. घरी पाहुणे येणार म्हणून किराणा साहित्यही भरून ठेवले होते. मात्र ४ ऑगस्टपासून कोसळणा-या पावसाने दोन दिवसांत घरात पाणी घुसले.

सदरबाजार येथील आंबेडकर कॉलनी येथे स्थलांतरित करण्यात आल्यानंतरही मुकुंद यांचे लक्ष घराकडेच होते. रोहिणीच्या विवाहासाठी आणलेल्या साहित्यामुळे होणा-या नुकसानीने त्यांना अस्वस्थ केले. स्थलांतरित कॅम्पमधून ९ ऑगस्टला सकाळी घरी जाऊन पाण्याची स्थिती काय आहे, ते पाहून येतो असे सांगून ते घराजवळ आले. महापुराच्या पाण्याने चोहोबाजूने वेढलेल्या घराची अवस्था त्यांना पाहवली नाही. घरासमोरच ते कोसळले. रेस्क्यू टीममधील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

घरी गेल्यानंतर विवाहाची तयारी कशी करायची, अशा गप्पांमध्ये रंगलेल्या रोहिणीच्या कानावर वडिलांच्या निधनाची बातमी जाताच, तिने टाहो फोडला. आधीच महापुराने राहत्या घराचा पाया ढासळण्याची भीती होती आणि त्यात हक्काच्या घराला पडलेल्या पाण्याच्या वेढ्याचे दु:ख असह्य झालेल्या वडिलांचे पार्थिव पाहून रोहिणीने हंबरडा फोडला. चार दिवसांनी रोहिणीला निरोप देण्यासाठी डोळ्यात पाणी असलेले वडील मुकुंद हवे होते, त्याचवेळी वडिलांना अखेरचा निरोप देणारी रोहिणी दारात उभी होती.

महापुरासोबत आनंदही ओसरला

पूर ओसरल्यानंतर रोहिणी ही आई, भाऊ व बहिणींसोबत घरी आली आहे. पुराच्या पाण्याने घरातील एकही वस्तू शिल्लक ठेवलेली नाही. रोहिणीच्या शालूचा पोतेरा झाला आहे. आहेराचे कपडे भिजून कुजले आहेत. धान्याला कोंब आले आहेत. सध्या तरी विवाह लांबणीवर टाकण्यात आला आहे. घरातील कचरा काढताना वडिलांच्या आठवणीच्या अनेक खुणा रोहिणीच्या हाताला लागत आहेत. लांबणीवर टाकलेला विवाह काही दिवसांनी होईल, पण तेव्हा तिची पाठवणी करण्यासाठी वडील मुकुंद नसतील.

(PRAHAAR)