X Close
X
9819022904

पाकिस्तानी जनतेने आपल्याच वैमानिकाला ठार मारले


Students-of-Islami-Jamiat

नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वाघा सीमेवरून भारतात परतले आणि १३० कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. अभिनंदन यांच्या आगमनानंतर देशभरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अभिनंदन यांनी पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ या फायटर विमानाचे पायलट विंग कमांडर शहाझुद्दीन यांना मात्र पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून आपल्याच वैमानिकाला जबर मारहाण करुन ठार मारले.

पाकिस्तानचे एफ-१६ हे फायटर विमान पाडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पॅराशूटद्वारे उतरलेल्या शहाजुद्दीन यांना भारतीय समजून जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत शहाजुद्दीन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ‘फर्स्ट पोस्ट’ या वेबसाइटने हे वृत्त दिले आहे.

२७ फेब्रुवारीच्या सकाळी पाकिस्तान हवाई दलाच्या ३ लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. त्यांना हुसकावून लावताना भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने आमने सामने आली होती. तेव्हा भारताचे मिग २१ आणि पाकिस्तानचे एफ १६ विमान खाली कोसळले होते. त्यावेळी दोन्ही विमानातील जवान पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरले होते.

मात्र पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरुप भारतात परतले. मात्र पाकिस्तानी वैमानिकाला पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून जबर मारहाण केली. या मारहाणीत विंग कमांडर शहाजुद्दीन यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहाजुद्दीन खाली उतरत असताना आधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेश फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी मारहाण केली.

भारतीय वैमानिक अभिनंदन यांनाही पाकिस्तानी जनतेने मारहाणही केली. मात्र ऐनवेळी पाकिस्तानी लष्कराने तिथे पोहोचून अभिनंदन यांना आपल्या ताब्यात घेतले होते. परंतु शहाजुद्दीन मात्र दुर्दैवी ठरले.

अभिनंदन यांच्याप्रमाणे शहाजुद्दीन यांचेही वडील सैन्यात होते

अभिनंदन यांच्याप्रमाणे शहाजुद्दीन यांचेही वडील सैन्यात होते. अभिनंदन यांचे वडील एस. वर्धमान भारतीय हवाई दलात, तर शहादुद्दीन यांचे वडील वसीमुद्दीन हे पाकिस्तानी हवाई दलात एअर मार्शल होते.

(PRAHAAR)