X Close
X
9819022904

पाकिस्तानवर डावाने विजय


Mumbai:

अ‍ॅडलेड : दुसरी कसोटी एक डाव आणि ४८ धावांनी जिंकताना ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत २-० असे निर्भेळ यश मिळवले.

अ‍ॅडलेड ओव्हलवरील कसोटीमुळे भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र (डे-नाईट) कसोटी जिंकण्याची करामत साधली. २८७ धावांनी पिछाडीवर असून पाकिस्तानसमोर डावाच्या पराभवाचे सावट होते. ३ बाद ३९ धावांवरून पुढे खेळताना पाहुण्यांनी २३९ धावांची मजल मारली. मात्र डावाचा पराभव टाळण्यात त्यांना अपयश आले. सलामीवीर शान मसूदसह (६८ धावा) मधल्या फळीमध्ये असद शफीक (५७ धावा) आणि मोहम्मद रिझवानमुळे (४५ धावा) पाकिस्तानने दोन सत्रे खेळून काढताना पराभव लांबवला. ऑफस्पिनर नॅथन लियॉनने (६९-५) निम्मा संघ गारद करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला वेगवान गोलंदाज जोश हॅझ्लेवुडची (६३-३) चांगली साथ लाभली.

ऑस्ट्रेलियाने एकदाच (३ बाद ५८९ धावा) फलंदाजी केली. त्यानंतर पाकिस्तानला दोनदा बाद केले. पाहुण्यांना पहिल्या डावात ३०२ धावा करता आल्या. ‘फॉलोऑन’च्या नामुष्कीनंतर पाकिस्तानने दुस-या डावात २३९ धावांची मजल मारली. वेगवान मिचेल स्टार्कने पहिल्या डावात ६ विकेट आणि ऑफस्पिनर लियॉनने दुस-या डावात ५ विकेट घेताना पाकिस्तानला दोनदा ‘ऑलआउट’ करण्यात मोलाचा वाटा उचलला तरी ३३५ धावांची नाबाद खेळी करणा-या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. वॉर्नरने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते.