X Close
X
9819022904

पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरून ‘भाजप’ गायब


Mumbai:

बीड : फेसबुकवर भावनिक आवाहन केल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटर अकाऊंटवरून ‘भाजप’ हे शब्दच काढून टाकले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे खरेच भाजपवर नाराज आहेत का या चर्चाना उधाण आले आहे.

फेसबुकवरील कालच्या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी आपण १२ डिसेंबरला गोपीनाथगडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले होते. आता त्या १२ डिसेंबरला कोणती भूमिका जाहीर करतात का याकडे लक्ष लागले आहे. परळी मतदारसंघातून पराजय झाल्यानंतर पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या प्रश्नांवर थोडा विचार करण्यासाठी स्वत:ला वेळ हवा आहे. याकरता आपण आठ ते दहा दिवस कुणाशीही संपर्क साधणार नाही, असे पंकजा मुंडे त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या.

१२ डिसेंबर रोजी भाजप दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या दिवशी आपण मनसोक्त बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय? १२ डिसेंबरला पंकजा मुंडे वेगळा निर्णय सगळ्यांसमोर मांडणार आहेत का? अशी चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. पंकजा सध्या कोणत्याही सभागृहाच्या प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांनी भाजपचा उल्लेख काढला असावा असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेही यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन अशाचप्रकारे उल्लेख काढला होता. तेव्हाही अशीच चर्चा रंगली होती.

या अफवाच : चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडे या काल, आज आणि उद्याही भाजपमध्येच राहणार आहेत. त्या भाजप सोडून दुसरा कोणता विचार करणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.

पंकजा मुंडे भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या चालू आहेत. यावर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. पंकजा मुंडे या भाजपशी एकनिष्ठ आहेत. त्या कोणताही वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची पक्षावर निष्ठा असल्याचे पाटील म्हणाले. अपघाती सरकारच्या डोक्यातून या संकल्पना आल्या असल्याच्या आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. हे नवीन सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नसल्याचे पाटील म्हणाले. १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी आहे. आम्ही सगळे त्यांना वंदन करण्यासाठी गोपीनाथ गडावर जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.