X Close
X
9819022904

नि:स्पृह आणि धडाकेबाज व्यक्तिमत्त्व


Mumbai:

मेधा कुलकर्णी : माजी आमदार, राष्ट्रीय उपाध्यक्ष, महिला मोर्चा, भाजपा

मुख्यमंत्री असो किंवा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा कमी झालेला नाही. ‘डाऊन टू अर्थ’ असं हे व्यक्तिमत्त्व आहे. पातळी सोडून टीका करणं त्यांच्या स्वभावात नाही. त्यांच्या कामाचा आवाका स्मीमित करणारा आहे. वाढदिवसानिमित्त देवेंद्र यांच्या कार्याचा घेतलेला वेध.

२०१४ मध्ये भाजप-सेना युतीचे सरकार राज्यात आले आणि मुख्यमंत्रीपदाच्या निमित्ताने राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं प्रथमच तरुण चेहरा लाभला. पहिल्यांदा सीएम झालेल्या फडणवीस यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. त्या त्यांनी पूर्ण केल्या. प्रत्येक क्षेत्रात राज्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनासाठी आमदार म्हणून काम करण्याची संधी लाभली, याचा अभिमान वाटतो. भाजपमध्ये आजवर विविध पदांवर काम करताना वेळोवेळी फडणवीस यांचं मार्गदर्शन लाभलं. प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नि:स्पृह वृत्ती आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. उत्तम वक्ता अशीही त्यांची ख्याती आहे. त्यांनी यापूर्वी, आमदार तसेच विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेत विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवला आहे. कोणावर अकारण आरोप न करता, त्या संदर्भातली नेमकी माहिती घेऊन त्यांनी आपला मुद्दा प्रभावीपणे पटवून दिला. यामुळेच त्यांचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून गौरव करण्यात आला. आमच्या ‘मुक्तछंद’ या संस्थेतर्फे दरवर्षी प्रमोद महाजन यांच्या स्मृितप्रीत्यर्थ उत्कृष्ट वक्ता पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारानेही फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पक्षवाढीसाठी तळमळीने केलेले प्रयत्न लक्षात घेण्यासारखे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या टीममध्ये प्रदेश चिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजवर काम केलं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर विविध योजनांची घोषणा केली आणि त्यांच्या अंमलबजावणीवरही भर दिला. त्यात ‘जलयुक्त शिवार’सारख्या योजनेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दिलेल्या आश्वासनानुसार एलबीटी रद्द करणं, टोलमुक्ती हे महत्त्वाचे निर्णय घेतले. आधीच्या सरकारने पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना पाच हजार कोटींची मदत केली होती, मात्र देवेंद्र यांच्या सरकारने वर्षभराच्या कालावधीतच गारपीटग्रस्तांसाठी ४९०० कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. हे अफाट काम पाहिल्यावर फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून ‘आधुनिक भगीरथ’ म्हणणंच योग्य ठरेल.

राजकारणात महत्त्वाची पदं मिळाली की, अहंभाव वाढीस लागण्याची शक्यता अधिक असते; परंतु तरुण वयात मुख्यमंत्रीपदासारख्या महत्त्वाच्या पदाची संधी मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा कमी झाला नाही. ‘डाऊन टू अर्थ’ असं हे व्यक्तिमत्त्व आहे. ते कोणावरही पातळी सोडून टीका करत नाहीत. किंबहुना, ते कायम आपण केलेलं काम आणि यापुढील काळात राबवणार असलेल्या योजना यावरच बोलतात. निष्कलंक चारित्र्य हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य.

२०१९ मधील निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळूनही विरोधी पक्षात बसावे लागले. मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या टर्मसाठी ते पात्र होते. मात्र, शिवसेनेने दगाफटका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेता होण्याची वेळ आली. मुख्यमंत्रीपद गेले तरी फडणवीस यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काही फरक पडला नाही. प्रत्येक विषयाचा अभ्यासपूर्ण अभ्यास तसेच अचूक भाष्य यामुळे त्यांनी गेल्या दीड वर्षांत सध्याच्या आघाडी सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा १०० कोटींची खंडणी किंवा मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण असो. फडणवीस यांनी प्रत्येक मुद्द्यावर ठाकरे सरकारला जेरीस आणले आहे. त्यामुळे फडणवीसांची पत्रकार परिषद असो किंवा विधानसभेतील उपस्थिती विद्यमान सरकारची फे फे उडते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलेल्या वाझे प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्या अधिवेशनामध्ये केवळ विधानसभा विरोधी पक्षनेते फडणवीस यांची छाप राहिली. फडणवीस यांनी आक्रमकपणे चिरफाड केलेल्या अनेक प्रकरणांमुळे ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. एक विरोधी पक्षनेता सरकारला किती जेरीस आणू शकतो, हे फडणवीस यांनी सर्वांना दाखवून दिले आहे.

मुख्यमंत्रीपद असो किंवा नसो. कायम जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. तसेच राजकारणी म्हणून आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. विरोधी पक्षनेता असूनही त्यांच्या मार्गदर्शनातून राज्याची उत्तम प्रगती साधली जाईल, असा सर्वांना विश्वास आहे. देवेंद्र यांच्यासारख्या हुशार व्यक्तीची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे यावी, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! (अद्वैत फीचर्स)