X Close
X
9819022904

नंदलाल बोस


Mumbai:

भारतीय कलेच्या नवजागरण आंदोलनाचे प्रमुख, प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांचा आज जन्मदिन. दि. ३ डिसेंबर १८८२ रोजी खरगपूर येथे त्यांचा जन्म झाला. रवींद्र शैलीचे चित्रकार, कलाशिक्षक म्हणून ते ओळखले जातात. ‘सती’ या १९०७ मध्ये त्यांनी काढलेल्या चित्राने त्यांना लौकिक मिळवून दिला.

१९२१ पासून ते शांतिनिकेतनमधील कलाविभागाचे संचालक म्हणून काम पाहू लागले. नंदलाल पूर्णचंद्र बोस यांच्या चित्रप्रणालीत देशी रंग, देशी कागद आणि देशी तंत्र यांचाच वापर असे. त्यांना महात्माजींचा सहवास लाभला.

फैजपूर, त्रिपुरा अशा ठिकाणच्या काँग्रेस अधिवेशनात प्रवेशद्वार व सभामंच सजविण्याचे कामही त्यांनी केले होते. गांधीजींच्या स्वदेशी तत्त्वज्ञानाचा कलात्मक प्रयोग त्यांच्या हातून होत असे. नंदलाल बोस यांनी आसपासची चालती फिरती माणसे, गाय-बक-या, पशु-पक्ष्यी यांच्या रूपवैशिष्टय़ांचा बारकाईने अभ्यास केला असल्याने त्यांच्या रेखाटनात असाधारण प्रभुत्व दिसून येई.

कलकत्ता, बनारस व विश्वभारती विद्यालयांनी सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरविलेला हा जगद्विख्यात चित्रकार. भारत सरकारनेही त्यांचा ‘पद्मभूषण’ किताब देऊन गौरव केला. एप्रिल १९६६ मध्ये त्यांचे शांतिनिकेतन येथे निधन झाले. आज त्यांचा जन्मदिन.