X Close
X
9819022904

धारावीतील स्कायवॉक कधी पूर्ण होणार


Mumbai:

धारावीकरांचा म्हाडाला सवाल

मुंबई : धारावीतील हजारो रहिवासी, पादचा-यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ६० फूट मार्गावरील स्कायवॉक गेली सहा वर्षे रखडला आहे. माहीम स्थानकास जोडणारा हा स्कायवॉक २०१९ हे वर्ष संपत आले तरीही पूर्णत्वास गेलेला नाही. एमएमआरडीएने दिलेल्या निधीतून म्हाडाकडून हा स्कायवॉक बांधला जाणार आहे. पण पश्चिम रेल्वेकडून अद्यापही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळालेले नसल्याने स्कायवॉकचा केवळ एकच टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा बाकी आहे.

माहीम रेल्वे स्थानकातून थेट धारावीत जाण्याचा मार्ग स्कायवॉकने उपलब्ध होणार आहे. धारावीतील गर्दी, वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हा स्कायवॉक उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी २०१३ मध्ये स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची जबाबदारी म्हाडावर सोपविण्यात आली. या गजबजलेल्या ठिकाणी स्कायवॉक बांधणे कठीण असल्याने त्याची जबाबदारी घेण्यास अन्य यंत्रणा तयार नव्हत्या. त्यामुळे ती जबाबदारी म्हाडावर सोपविली गेली. त्यासाठी एमएमआरडीएनेही निधी दिला.

या निधीतून मे २०१५मध्ये धारावीतील अभ्युदय बँक ते सेक्टर तीनमध्ये पहिल्या टप्प्यात २९४ मीटर लांबीचा स्कायवॉक बांधला. त्याचा पूर्ण क्षमतेने वापर न झाल्याने त्यास माहीम स्थानकापर्यंत नेण्याचे ठरविण्यात आले. त्यात हा स्कायवॉक माहीम रेल्वे स्थानकातील पादचारी पुलास जोडला जाईल, अशी योजना आहे,

त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच स्कायवॉकवरून धारावीत जाता येऊ शकते. पण हा टप्पा पूर्ण न झाल्याने धारावीवासीयांचे हाल होत असल्याचे स्थानिक आमदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.