X Close
X
9819022904

दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्याची परवानगी मिळावी


covid-vaccine25122020060823

पुणे (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड प्रसारमाध्यमांना सांगितले.

‘प्रत्येकाची मते वेगवेगळी आहेत. काही जणांना वाटतं पुढचे १०० ते १२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या दिवसांत कोरोना नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं. अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसतात. अशी बेफिकिरी योग्य नाही,’ असं पवार म्हणाले. केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या प्रमाणात कोविड लस मिळायला हवी. मात्र, तसं होताना दिसत नाही. लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल, असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ‘पूर्वी लोक लस घ्यायला घाबरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची बदललेली मानसिकता सकारात्मक बाब आहे, असंही ते म्हणाले.

तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तडकाफडकी कुठलीही मोकळीक देण्यास तयार नाही. त्यामुळं लॉकडाऊन उठवण्याचे वेगवेगळे पर्याय पुढं येऊ लागले आहेत. पिंपरी-चिंचवड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाऊनमुळे लोकांना मुक्तपणे वावरता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी लोकल बंद असल्यानं हजारो लोकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे.

(PRAHAAR)